पंचंगगा घाटास यात्रेचे स्वरूप
By Admin | Updated: July 7, 2014 00:51 IST2014-07-07T00:49:36+5:302014-07-07T00:51:37+5:30
पाण्याच्या पातळीत वाढ : मंदिरांत पाणी; कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

पंचंगगा घाटास यात्रेचे स्वरूप
कोल्हापूर : प्रखर प्रकाश, शुद्ध हवा आणि पंचगंगा नदीच्या तीरावर पाण्याची पातळी कमी झाल्याने दोनशे वर्षांपूर्वीची मंदिरे खुली झाली आहेत. ही मंदिरे पाहण्यासाठी पंचगंगा घाट नागरिकांनी आज, रविवारी दिवसभर फुलून गेला. खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि पर्यटकांच्या गर्दीने घाटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. नेहमीपेक्षा आज पाण्याची पातळी वाढल्याने मंदिरांतून पाणी शिरले आहे. त्यामुळे आणखी काही दिवसच या मंदिरांचे दर्शन घडणार आहे.
पावसाने दडी मारल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे गेली पंधरा वर्षे पाण्याखाली असलेल्या दोनशे वर्षांपूर्वीची देव-देवतांची मंदिरे खुली झाली आहेत. ब्रह्मदेव आणि महादेवाची ही मंदिरे असल्याने त्यांच्या दर्शनासाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागरिकांची गर्दी होत आहे.
नागरिक व पर्यटकांची गर्दी वाढल्याने खाद्यपदार्थांच्या गाड्यांनीही याठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा घाटाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. महापालिकेच्यावतीने या मंदिरासभोवतालचा गाळ काढण्याचे काम सुरू आहे. अत्यंत कोरीव आणि आकर्षक मंदिरांची रचना पाहून पर्यटक अचंबित होत आहेत. प्रत्येक भाविक, पर्यटक आपल्या मोबाईलद्वारे मंदिरांचे फोटो काढताना दिसत आहेत. काही दिवसांनी पावसामुळे पाणी पातळी वाढल्यानंतर पुन्हा ही मंदिरे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे आठवण म्हणून येणारी प्रत्येक व्यक्ती मंदिरासोबत आपलाही फोटो काढताना दिसत आहे.
दरम्यान, येथील सर्व मंदिरे पाण्यांनी स्वच्छ धुवून काढली. यासाठी महापालिकेच्यावतीने टँकरने पाणी पुरविले जात होते. महापालिकेचे कर्मचारी व नगरसेवक सत्यजित कदम व कार्यकर्ते हे दिवसभर मंदिराची स्वच्छता करताना दिसत होते.