शिवजयंतीला दिले गाव सणाचे स्वरूप
By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-20T00:07:29+5:302015-02-20T00:08:02+5:30
ऐक्याचे दर्शन : एकाच छताखाली पालखी सोहळा

शिवजयंतीला दिले गाव सणाचे स्वरूप
दत्तात्रय पाटील -म्हाकवे -शिवजयंती म्हटलं की, चौकाचौकांत भव्य मंडप, इतिहासाची गाथा गाणारा डॉल्बी, असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते; पण या सर्वालाच फाटा देत घराघरांत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून भडगाववासीयांनी (ता. कागल) शिवरायांना मानाचा मुजरा केला. शिवाय गावातील सर्व तरुण मंडळे, विद्यार्थी, आबालवृद्ध यांनी एकाच छताखाली येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढली. तुतारीसह सवाद्य निनादाने या पालखी मिरवणुकीत संपूर्ण गावात ऐक्याचे दर्शन घडून आले.
सुमारे अडीच ते तीन हजार लोकवस्ती असणाऱ्या या गावातील सर्व तरुण मंडळांनी एका छताखाली येऊन शिवजयंतीला व्यापक स्वरूप दिले. मिरवणुकीसाठी खास पालखीही तयार करण्यात आली.
दरम्यान, या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यादृष्टीने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. यासाठी जालंदर खतकर, मच्छिंद्र खतकर, समाधान सोनाळकर, वैभव भांडवले, दिग्विजय पाटील, रणजित खतकर, पिंटू चौगुले, युवराज भांडवले, प्रवीण चौगुले, आदी तरुणांसह गावातील सर्वच शिवप्रेमींसह न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेच्या शिक्षक व चिमुकल्या शिवप्रेमींनीही परिश्रम घेतले.
तरुणाईचा उत्साह डॉल्बीसमोर नाचण्यासाठी बहुदा तरुणांची चढाओढ असते. मात्र, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा जयघोषामुळे मिरवणुकीत वीरता संचारलेल्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये पालखीचा भोई होण्यासाठी आणि पालखी खांद्यावर जास्तीत जास्त वेळ घेण्यासाठी तरुणांत चढाओढ लागली होती.