नैसर्गिकरीत्या संवर्धित अंबाबाईची एकमेव मूर्ती

By Admin | Updated: August 2, 2015 01:19 IST2015-08-02T01:19:38+5:302015-08-02T01:19:38+5:30

वसंत शिंदे यांची माहिती : भारतातील पहिलाच प्रयोग; दररोज १३ तास संवर्धन

The naturally enriched Ambabai's only idol | नैसर्गिकरीत्या संवर्धित अंबाबाईची एकमेव मूर्ती

नैसर्गिकरीत्या संवर्धित अंबाबाईची एकमेव मूर्ती

कोल्हापूर : बिब्बा, बेहडा, दूर्वांचा रस, चंदन अशा नैसर्गिक साधनांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम करण्यात आले असून, हा भारतातील पहिला प्रयोग असल्याची माहिती डेक्कन कॉलेज, पुणेच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू व पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाईची ही मूर्ती ११व्या शतकातील असून, या संवर्धनामुळे ती अधिकच सुंदर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या सात अधिकाऱ्यांनी रोज १३ तास मूर्ती संवर्धनाचे काम केले आहे. आज, रविवारी संध्याकाळी ते पंढरपूरला रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ वसंत शिंदे यांनी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मूर्तीसंबंधी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले, भारतातील मूर्तींना पाश्चात्त्य पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून केमिकल कॉन्झर्वेशन केले जाते. या पद्धतीमध्ये रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पाच-दहा वर्षांनी मूर्ती अधिकच खराब होत जाते. भारताच्या स्थापत्यशास्त्र, मूर्तिशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मूर्ती संवर्धनाची खूप माहिती आहे, ज्यात विशिष्ट वनस्पती, फुले-पानांचा रस यांच्या लेपांची माहिती आहे. त्या आधारे अधिकारी मनेजर सिंग यांनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास करून, या नैसर्गिक साधनांचा वापर करीत अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम केले आहे. हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या संवर्धनासाठी बिब्बा, बेहड्याचा अर्क, दूर्वांचा रस, चंदनाची पूड, गाईच्या तुपापासून बनविलेले अंजन (काजळ) वापरण्यात आले आहे. त्यातही बिब्बा आणि बेहड्याच्या अर्काचे तीन वेळा आणि दुर्वांच्या रसाचे दोन वेळा कोटिंग केले आहे. या लेपाने मूर्तीचे कोणतेही नुकसान होणार नाही. हा प्रयोेग किती यशस्वी झाला आहे, हे पाहण्यासाठी दर सहा महिन्यांनी आम्ही मूर्तीची पाहणी-निरीक्षण करणार आहोत.
मूर्तीसह मंदिराचेही संवर्धन व्हावे
देवीची ही मूर्ती कमीत कमी ११ व्या शतकातील असून, अजूनही तिची स्थिती चांगली आहे. मंदिरदेखील त्याच कालावधीतील आहे. सध्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर, जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर अशा मंदिरांचे संवर्धन आमच्यावतीने केले जात आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीबरोबरच मंदिराचेही संवर्धन व्हायला हवे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच मूर्तीचा अभ्यासही व्हायला हवा.
मूर्तीचे मूळ सौंदर्य खुलले
शिंदे म्हणाले, अंबाबाई मूर्तीवर यापूर्वी केलेला वज्रलेप चुकीच्या पद्धतीचा होता. तो निघताना लावलेले एमसील, पितळी पट्ट्यांमुळे अतिरिक्त वजन पडले होते. हे सगळे प्रकार मूर्तीवरून काढले. त्यामुळे मूळ मूर्ती प्रकाशात आली. आम्ही केलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळे मूर्तीची झीज भरून निघाली.

Web Title: The naturally enriched Ambabai's only idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.