राष्ट्रवादीला ‘तंबाखूमुक्त अभियाना’चा विसर

By Admin | Updated: June 1, 2015 00:17 IST2015-05-31T23:29:12+5:302015-06-01T00:17:30+5:30

पदाधिकारी मिरविण्यापुरते : आर. आर. पाटील यांच्या आवाहनास अंजनीपुरताच प्रतिसाद

Nationwide forgets 'Tobacco-free campaign' | राष्ट्रवादीला ‘तंबाखूमुक्त अभियाना’चा विसर

राष्ट्रवादीला ‘तंबाखूमुक्त अभियाना’चा विसर

दत्ता पाटील -तासगाव -माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर अंजनीतील तरुणांनी तंबाखूमुक्तीचा संकल्प केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही ‘तंबाखूमुक्त अभियान’चा निर्धार करण्यात आला. प्रत्यक्ष यासाठी एकाही पदाधिकाऱ्याने पाऊल उचलले नाही. त्यामुळे अंजनी वगळता जिल्ह्यात कोठेही या अभियानाचे अस्तित्व दिसून येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी केवळ पद मिरवण्यापुरतेच आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तंबाखूविरोधी दिनादिवशी किमान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन तंबाखूमुक्त अभियानाची सुरुवात करतील, अशी अपेक्षा होती, मात्र रविवारी असा कोणताही कार्यक्रम तासगाव तालुक्यात झाला नाही. या दिनाचे औचित्य साधून आर. आर. पाटील यांच्या आवाहनाप्रमाणे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल उचलणे गरजेचे होते.
उपचार सुरू असताना आर. आर. पाटील यांना भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. यावेळी ‘तंबाखू खाऊ नका’, असे भावनिक आवाहन आबा प्रत्येकाला करीत होते. तशी शपथही घ्यायला लावत होते. आबांचे ते कळकळीचे आवाहन पाहून अनेक कार्यकर्त्यांनी तंबाखू कायमची सोडूनही दिली. त्यानंतर आबांचे निधन झाले. त्यांच्या रक्षाविसर्जनादिवशी अंजनीतील सर्व तरुणांनी एकत्रित येत, अंजनी गाव तंबाखूमुक्त करण्याची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ‘तंबाखूमुक्त अभियान’ राज्यभर राबविण्याचा संकल्प केला होता.
शुक्रवारी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कार्यकर्त्यांची परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान’ हीच आर. आर. पाटील यांना आदरांजली ठरणार असल्याचे मत मांडले होते. सुळे यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला; मात्र आर. आर. पाटील यांच्या पश्चात तालुक्यातील, जिल्ह्यातील राष्ट्रवादीने तंबाखू मुक्तीसाठी काय केले? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते. संकल्प अभियान अंजनीपुरतेच मर्यादित राहिले आहे. आर. आर. पाटील असताना त्यांच्या मागे-पुढे मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा मोठा होता, मात्र हेच कार्यकर्ते, पदाधिकारी पदाचा वापर मिरवण्यासाठी करताना दिसून येत आहेत. अद्यापपर्यंत एकाही पदाधिकाऱ्याने तंबाखूमुक्त अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाच्या माध्यमातून आर. आर. पाटील यांनी राज्यासह देशाला दिशा दिली. त्यांच्या पश्चात ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ अभियानाची सुरुवात त्यांच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून प्रभावीपणे झाल्यास आबांना खरी आदरांजली ठरली असती. मात्र पदाधिकाऱ्यांना त्याचा सोयीस्कर विसर पडलेला आहे.


किमान अपेक्षा तंबाखूमुक्त शाळांची
शाळांपासून किमान शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी कायद्याने बंदी आहे. मात्र कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे अनेक ठिकाणी शाळांच्या आवारात तंबाखूची विक्री सुरू आहे. राष्ट्रवादीची सोमवारी तासगावात बैठक आहे. यानिमित्ताने तंबाखूमुक्त शाळांसाठी राष्ट्रवादीकडून सुरूवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


सुप्रिया सुळेंच्या आवाहनालाही प्रतिसाद नाही
‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र’ अभियान राबविणे हीच खरी आर. आर. पाटील यांना आदरांजली ठरेल, त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष पुढाकार घेईल, अशी भावना त्यावेळी व्यक्त झाली होती. खासदार सुळे यांनी या अभियानाला चालनाही दिली आहे; मात्र त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील, तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

Web Title: Nationwide forgets 'Tobacco-free campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.