गडहिंग्लज पालिकेतून ‘राष्ट्रवादी’ पायउतार !
By Admin | Updated: July 7, 2015 23:49 IST2015-07-07T23:49:56+5:302015-07-07T23:49:56+5:30
सत्तांतराची पहिलीच घटना : हसन मुश्रीफ यांची सत्ता गेली, शिंदे पुन्हा सत्तेत; सत्ताधारी आणि विरोधकांत बाचाबाची

गडहिंग्लज पालिकेतून ‘राष्ट्रवादी’ पायउतार !
गडहिंग्लज : बहुमत असूनही पक्षाच्या नगरसेवकांवर अंकुश नसल्यामुळेच नगरपालिकेच्या सत्तेतून ‘राष्ट्रवादी’ला पायउतार व्हावे लागले. अशारितीने सत्तांतर होण्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची सत्ता हटवून पालिकेवर जनता दलाचा झेंडा लावण्यात ज्येष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदेंना यश आले. आज, मंगळवारी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अरूणा शिंदेचा एका मताने पराभव करून जनता दलाचे राजेश बोरगावे पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता पालिकेची विशेष सभा झाली. या निवडणुकीत बोरगावेंना नऊ, तर शिंदेना आठ मते मिळाली. निवडीनंतर तहसीलदारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. बोरगावे म्हणाले, आमचे नेते अॅड. शिंदे, सर्व सहकारी आणि बिलावर यांच्यामुळे पुन्हा नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारातून गडहिंग्लजचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहतील. सत्ता आली.. सत्ता गेली..!
तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दलाच्या नगराध्यक्षा अरुणा शिंदे यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविली. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादीला पालिकेची सत्ता मिळाली होती. त्याची परतफेड म्हणून खूप प्रयत्नांती राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी त्यांचा अर्ज
भरला होता. मात्र, ज्यांच्यामुळे सत्ता गेली त्यांना पुन्हा नगराध्यक्षपदावर
बसू द्यायचे नाही, असा चंगच
माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावेंनी बांधला होता. त्यांनी ईर्षेला
पडून केलेल्या प्रयत्नांमुळे सत्तांतर घडले. शिंदेच्यामुळे मिळालेली सत्ता त्यांच्यामुळेच हातातून जाण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. (प्रतिनिधी)
सत्तांतराची पहिलीच घटना : हसन मुश्रीफ यांची सत्ता गेली, शिंदे पुन्हा सत्तेत; सत्ताधारी आणि विरोधकांत बाचाबाची
प्रचंड बंदोबस्त अन् तणावही...!
संभाव्य सत्ता-संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. साडेदहाच्या सुमारास पहिल्यांदा ‘राष्ट्रवादी’चे व त्यांच्या पाठोपाठ विरोधी नगरसेवकांच्या गाड्या पालिकेजवळ आल्या. त्यावेळी विरोधकांच्या ताब्यातील बिलावरांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांनी खूप झोंबाझोंबी केली. मात्र, अक्षरक्ष : हाताचे कडे करून आपल्या ताब्यातील बिलावरांना त्यांनी ‘सुरक्षित’पणे सभागृहात आणले. त्यांच्याशी सत्ताधाऱ्यांचा कोणताही संपर्क होऊ दिला नाही. आजारामुळे थकलेल्या आणि दबावामुळे बिथरलेल्या असतानाही त्यांनी ‘राष्ट्रवादी’चा ‘व्हीप’ झुगारून हात उंचावून बोरगावेंच्या बाजूने मतदान केले.
‘शिंदें’चे भाकीत खरे ठरले
अॅड. शिदेंनी तीन वर्षांपूर्वी पालिकेतील सत्तातरानंतर एका कार्यक्रमात राष्ट्रवादीची सत्ता पाच वर्षे टिकणार नाही. त्यामुळे पालिकेवर पुन्हा आपलीच सत्ता येईल, असे भाकित केले होते. त्यांचे भाकित खरे ठरल्याची चर्चा मंगळवारच्या सत्तांतरानंतर गडहिंग्लजसह जिल्ह्यात आहे.
शिंदेंनी हिशेब चुकता केला
दोन वर्षांपूर्वी गडहिंग्लज कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या मदतीने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष श्रीपतराव शिंदेंवर अविश्वास ठराव आणून ब्रीसक् कंपनीकडे कारखाना चालवायला देण्यात मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. त्याचा शिंदेंना राग आहे. त्यामुळे पालिकेत सत्तांतर करून ‘कागल’चे राजकारण ‘गडहिंग्लज’मध्ये चालत नाही. याचा दाखला त्यांनी मुश्रीफांना यानिमित्ताने दिला.
कुपेकरांची आठवण अन् भैरीच्या नावानं...
स्व. कुपेकर यांच्यामुळे तुम्ही नगरसेवक झालात. त्याची जाण ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बिलावर यांचे मनपरिवर्तन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कुपेकरांचे नाव व त्यांनी केलेल्या मदतीची आठवण वारंवार करून देत त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू होता. हे लक्षात येताच ‘काळभैरीच्या नावानं चांगभलं’च्या घोषणा देत त्यांचा आवाजदेखील बिलावरांच्यापर्यत विरोधकांनी पोहचू दिला नाही.
‘राष्ट्रवादी’च्या साडेतीन वर्षांच्या कारभारावर गडहिंग्लजचे नागरिक नाराज होेते. पालिकेत सत्तांतर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. नगरसेविका बिलावर यांच्यावरही अन्याय झाला. नेते व पक्षाकडे दाद मागूनही त्यांना न्याय मिळाला नाही. आजारी असतानाही त्या सभेला आल्या. त्यांच्यावर येनकेनप्रकारे दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. भत्त्याची पाकिटे देण्याचा प्रयत्न करून त्यांच्या गरिबीची सभागृहात थट्टा केली. तरीदेखील त्यांनी स्वाभिमानाने आम्हाला पाठिंबा दिला व अन्यायाबद्दल वाचा फोडली. त्यामुळेच सत्तांतराची गडहिंग्लजकरांची इच्छा पूर्ण झाली. ‘गडहिंग्लज’ला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- प्रा. स्वाती कोरी, आघाडी प्रमुख, जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस.
नगरसेविका बिलावर यांना पक्षाने ‘व्हीप’ लागू केला होता. तरीदेखील त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात मतदान केले आहे. पक्षांतर बंदी कायद्याखाली त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करणार आहोत. शहराच्या विकासकामात सत्ताधाऱ्यांना आपले सहकार्य राहील.
- रामदास कुराडे, गटनेते राष्ट्रवादी