राष्ट्रवादी हाच खरा शत्रू

By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-13T00:39:06+5:302014-07-13T00:42:49+5:30

काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक : १५ वर्षांची दोस्ती तोडण्याची कार्यकर्त्यांची मागणी

Nationalist is the real enemy | राष्ट्रवादी हाच खरा शत्रू

राष्ट्रवादी हाच खरा शत्रू

कोल्हापूर : राज्यात शिवसेना-भाजप या पक्षांपेक्षा आपला खरा शत्रू हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच आहे. या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेसची व मुख्यमंत्र्यांची केली तेवढी बदनामी आता पुरे झाली. म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरची दोस्ती तोडून आता काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, अशी आग्रही मागणी आज, शनिवारी दुपारी कॉँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय निरीक्षकांपुढे केली. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते काँग्रेसला मदत करीत नाहीत, उलट अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला.
अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीचे निरीक्षक माजी मंत्री रघुवीरसिंग मीना यांनी आज, येथील कॉँग्रेस कार्यालयात जाऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सुरुवातीला त्यांनी एकत्रित बैठकीत कार्यकर्ते, नेत्यांची मते जाणून घेतली, त्यानंतर त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांना भेटून त्यांचीही मते जाणून घेतली.
कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, असा एकमुखी ठरावही यावेळी केला. पक्षश्रेष्ठींना कोल्हापूरकरांची भूमिका ठामपणे सांगावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रदेश कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे यांनी सर्वप्रथम स्वबळाचा सूर आळवला. त्यानंतर आमदार सा. रे. पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, मंत्री सतेज पाटील, भरमू सुबराव पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, सुरेश कुराडे या सुरात सूर मिळवीत कॉँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे असेल तर स्वबळावर लढावे, तसा आग्रह पक्षश्रेष्ठींपुढे धरावा, अशी मागणी केली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, उपाध्यक्ष हिंदुराव चौगुुले, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजीवनीदेवी गायकवाड, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, बाळासाहेब सरनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist is the real enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.