राष्ट्रवादीला नडले सोयीचे राजकारण
By Admin | Updated: October 21, 2014 00:21 IST2014-10-21T00:02:22+5:302014-10-21T00:21:10+5:30
आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर

राष्ट्रवादीला नडले सोयीचे राजकारण
राजाराम लोंढे - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती पीछेहाट झाली. गेली पंधरा वर्षे जिल्ह्याला लाल दिवा अखंडपणे देणाऱ्या राष्ट्रवादीला सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करता आले नाहीत. आठपैकी चार उमेदवारांची डिपॉझीट जप्त झाली, एवढी नामुष्की पक्षावर ओढवली. नेत्यांच्या सोयीचे राजकारण केल्याने बालेकिल्ल्यातच पक्षाला मोठा फटका बसला.
गेल्या पाच वर्षांत नेत्यांनी आपले मतदारसंघ सोडून इतरत्र लक्ष न दिल्याने पक्षाची वाताहात झाली. परिणामी लोकसभा निवडणुकीत ‘हातकणंगले’ची जागा काँग्रेसला सोडावी लागली. कोल्हापूरची जागा जिंकताना सर्वांच्या नाकात दम आला. त्यातून स्थानिक नेत्यांनी फारसा बोध घेतला नाही. दहा वर्षांची आघाडी कायम राहू शकते, या भ्रमात जिल्ह्यातील नेते होते; पण ऐनवेळी आघाडी तुटली आणि नेत्यांची भंबेरी उडाली. दहाही जागा लढविण्याची वल्गना करणारे उघड्यावर पडले. कसेबसे आठ जागांवर उमेदवार देता आले. तेही देताना पक्षापेक्षा स्वत:ची राजकीय सोय बघितल्याने तेथे पक्षाची अक्षरश: वाताहात झाली. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले या तालुक्यांत पक्षाची ताकद फारशी नाही. या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी नेत्यांनी आपलेच मतदारसंघ अधिक सुरक्षित केले. ‘करवीर’मधून अनपेक्षितपणे माघार घेऊन जिल्हाध्यक्षांनी आपला मतदारसंघ सुरक्षित केला; पण तेच अडचणीत आले. ‘शिरोळ’मध्ये माने व यड्रावकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटला नाही. इचलकरंजीमध्येही तीच परिस्थिती राहिली. हातकणंगले व शाहूवाडीत मैत्रीला जागण्यासाठी कमकुवत उमेदवार दिले.
कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांना उमेदवारी दिली. ‘उत्तर’मध्ये पक्षाच्या महापौरांसह सुमारे २२ नगरसेवक येतात. यापैकी बहुतांशी नगरसेवक अन्य पक्षाच्या व्यासपीठावर उघड होते; पण नंतर पोवार यांनी तक्रार केल्यानंतर रॅलीत सहभागी झाले. पण, त्याचे मतात रूपांतर झाले नाही. पोवार यांना अवघी ९८८७ इतकी मते मिळाली. यावरून नेत्यांच्या राजकीय खेळ्या स्पष्ट होतात. याला स्थानिक नेत्यांचे सोयीचे राजकारणच कारणीभूत ठरले आहे.
वजाबाकीचे राजकारण
गेले पाच वर्षांत पक्षात नवीन आलेले व पक्ष सोडून गेलेल्यांची संख्या पाहिली, तर पक्षाची कामगिरी लक्षात येते. धनंजय महाडिक (एकटेच) राष्ट्रवादीत आले, पण पाच वर्षांत अनेक चांगली माणसे पक्षातून बाजूला गेली. काहीजण सध्या काठावर आहेत. त्यामुळे नेत्यांनी बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण सुरू केल्याने पक्षाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार हे निश्चित आहे.