कोल्हापूर: महानगरपालिकेतील निवडणुकीनंतर बहुमताचे गणित काही केल्या जमत नाही म्हटल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चमत्कार घडवून आणण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा राष्ट्रवादीकडे होत्या. मात्र, घेतलेल्या निर्णयात बदल न करता राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत काँग्रेसला दिलेला शब्द पाळला. या निवडणुकीत सर्वाधिक ३२ (१३+१९) जागा भाजप-ताराराणी आघाडीला मिळाल्या. त्याखालोखाल कॉँग्रेसला २७, तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. शिवसेनेचे चार, तर तीन अपक्ष नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सत्तेसाठी पालकमंत्री वरच्या पातळीवर प्रयत्न करीत राहिले, तर खाली जिल्हा पातळीवर सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी हातात हात घालून ‘जुनी मैत्री तोडायची नाय’ असा निर्धार केला. दरम्यान परगावी सहलीवर नेलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४४ नगरसेवकांना सोमवारी सकाळी सात वाजता कोल्हापुरात ‘अजिंक्यतारा’वर आणण्यात आले. तेथे काहीवेळ माजी मंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केल्यानंतर तेथून साडेदहा वाजता सर्व नगरसेवक आरामबसमधून महानगरपालिकेत आले. त्यांच्यासोबत पुढे गाडीतून माजी मंत्री सतेज पाटील, महापौर पदाच्या उमेदवार अश्विनी रामाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऋतुराज पाटील हे होते. त्यापाठोपाठ असणाऱ्या गाडीत प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राष्ट्रीय सदस्य आर. के. पोवार, उपमहापौर पदाच्या उमेदवार शमा मुल्ला, तसेच शहराध्यक्ष राजू लाटकर हे होते. दोन्हीही उमेदवारांनी पक्षाचे तिरंगी फेटे डोक्यावर घातले होते, तर नेत्यांनी डोक्यावर नारंगी रंगाचे फेटे बांधले होते. त्यापाठोपाठ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी डोक्यावर गुलाबी फेटे, गळ्यात पक्षाचे स्कार्प घातले होते. पाठोपाठ हॉटेल पॅव्हेलियन येथून आरामबसमधून भाजप-ताराराणी महायुतीचे नेते सुनील कदम, महेश जाधव यांच्यासह महापौर पदाच्या उमेदवार सविता भालकर व राजसिंह शेळके हे सकाळी १०.५० वाजता महापालिकेत आले. त्यांच्यासोबत भाजप-ताराराणी महायुतीचे ३२ नगरसेवक व अपक्ष राजू दिंडोर्ले हे सर्वजण पक्षाच्या व नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देत महापालिकेत आले. यावेळी नगरसेवकांच्या गळ्यात भाजप-ताराराणी आघाडीचे स्कार्प होते, तर हातात पक्षाचे झेंडे होते. हे सर्व नगरसेवक थेट महापालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू सभागृहातच गेले. दोन्हीही पक्ष, आघाड्यांचे कार्यकर्ते, नेते महापालिका चौकातच थांबून होते. सभागृहातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर सतेज पाटील आणि प्रल्हाद चव्हाण हे इतर नेत्यांवर जबाबदारी सोपवून निघून गेले. नगरसेवक सभागृहात, तर नेते चौकातराष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे यावेळी अनुपस्थित असल्याने त्यांचे फोटो असणारे बॅनर नगरसेवकांच्या हातात होते. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे होते. सर्व नगरसेवक महानगरपालिका चौकात आल्यानंतर पक्षाच्या आणि नेत्यांसह उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. काही वेळ विठ्ठल रामजी शिंदे चौकात थांबून आघाडीचे नगरसेवक सभागृहात गेले, तर नेते चौकातच थांबून होते.
राष्ट्रवादी काँगे्रसने शब्द पाळला
By admin | Updated: November 17, 2015 01:05 IST