‘राष्ट्रवादी’ चंदगडला ‘भाजप’बरोबर !

By Admin | Updated: January 19, 2017 00:35 IST2017-01-19T00:35:24+5:302017-01-19T00:35:24+5:30

नेतृत्वाकडूनच हिरवा कंदील : आठवड्यापूर्वीच बेळगावमध्ये युती आणि जागावाटपाबाबत चर्चा

'Nationalist' Chandgad with 'BJP'! | ‘राष्ट्रवादी’ चंदगडला ‘भाजप’बरोबर !

‘राष्ट्रवादी’ चंदगडला ‘भाजप’बरोबर !

राम मगदूम -- गडहिंग्लजजिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रसला रोखण्याची भाषा करणारा ‘भाजप’ चंदगड तालुक्यात ‘राष्ट्रवादी’बरोबर जाण्यास तयार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने त्यास पुष्टी मिळाली आहे. आठवड्यापूर्वीच बेळगाव मुक्कामी दोन्हीही पक्षांचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची युती आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे.
गेल्यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय बाबासाहेब कुपेकरांनी घेतला. त्यांच्याविरोधात माजी मंत्री भरमूअण्णा पाटील व माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी युती केली. त्यावेळी गोपाळराव पाटील यांनी तटस्थ राहणेची भूमिका घेतली होती.दरम्यान, ५ वर्षांत जिल्ह्याबरोबर तालुक्यातील राजकीय समीकरणेही पार बदलून गेली आहेत. दुर्दैवाने कुपेकर व नरसिंगराव पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसांना स्वत:चे राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तडजोड करण्याची वेळ आली आहे. यावेळीही चंदगड तालुक्यात भरमूअण्णा आणि नरसिंगराव गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात त्यांच्यातही चर्चेच्या फेऱ्या झडल्या असून, युतीची घोषणाच बाकी आहे.या पार्श्वभूमीवरच आमदार संध्यादेवी कुपेकर आणि भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य गोपाळराव पाटील यांनाही स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र यावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत ‘एकत्र’ येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ पैकी निम्म्या-निम्म्या जागा एकमेकांनी वाटून घ्यायच्या आणि दोघांनीही आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवायची. वरिष्ठ पातळीवरून दोघांवरही कोणताही दबाव आल्यास त्याचा परिणाम युतीवर होऊ द्यायचा नाही, असेही चर्चेअंती ठरल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

कुपेकरांच्याविरोधात निवडणूक
२००१ मध्ये दौलत कारखान्याच्या निवडणुकीत गोपाळरावांनी नरसिंगरावांच्या विरोधात बंड केले. त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये नरसिंगरावांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे, तर २००९ मध्ये कुपेकरांच्याविरोधात जनसुराज्यतर्फे विधानसभेची निवडणूक लढवली.
किंबहुना, २००९ अखेर गोपाळराव राष्ट्रवादीमध्येच होते. त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीबरोबरच जुळवून घेणे सहज शक्य आणि फायद्याचे आहे. यासंदर्भात त्यांनीही वरिष्ठांकडून हिरवा कंदील घेतल्याचे समजते.चंदगडमधील लढाई भरमूअण्णा व नरसिंगराव गट आणि राष्ट्रवादी व भाजप यांच्यातच होईल असे दिसते.

जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या विरोधात लढत असताना चंदगड तालुक्यात भाजपबरोबर कसे जायचे? हा तात्त्विक मुद्दा आहे.
परंतु, यासंदर्भात आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी थेट वरिष्ठांशी चर्चा करून ‘परवानगी’ मिळविल्याची चर्चा आहे.

Web Title: 'Nationalist' Chandgad with 'BJP'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.