‘राष्ट्रवादी’समोर वर्चस्व टिकविण्याचे आव्हान !
By Admin | Updated: February 15, 2017 23:50 IST2017-02-15T23:50:35+5:302017-02-15T23:50:35+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : गडहिंग्लजमध्ये तेली, आजऱ्यात गुरव-केसरकर, चंदगडला ‘एम.जें.’ची नाराजी भोवणार?

‘राष्ट्रवादी’समोर वर्चस्व टिकविण्याचे आव्हान !
राम मगदूम -- गडहिंग्लज --गेल्या दोन दशकांपासून गडहिंग्लज विभागातील एकमेव प्रबळ पक्ष म्हणून जिल्ह्यात बोलबाला असणाऱ्या राष्ट्रवादीसमोर यावेळी वर्चस्व टिकविण्याचे आव्हान आहे. किंबहुना, गडहिंग्लज व आजरा पंचायत समितींवरील पक्षाची सत्ता अबाधित ठेवण्याबरोबरच चंदगड विधानसभा मतदार संघावरील वर्चस्वासाठीही पक्षाला संघर्ष करावा लागणार आहे.गेल्यावेळी बाबासाहेब कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय मुत्सद्दीगिरीने घेतला. त्यामुळे भरघोस यशही मिळाले. त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकूण १६ उमेदवार निवडून आले. त्यापैकी तब्बल सात म्हणजे सभागृहातील पक्षाची निम्मी ताकद गडहिंग्लज विभागाची होती. यापैकी गिजवणे गट हा आमदार मुश्रीफांच्या कागल मतदारसंघात आहे.
गेल्यावेळेप्रमाणे राष्ट्रवादी यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील पाचही जागा, ‘चंदगड’मधील चार पैकी केवळ दोन जागा लढवित आहे. आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जि.प.ची जागा पक्षाने काँगे्रसला सोडली आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विद्यमान जि. प. सदस्या संजीवनी गुरव यांनी बंडखोरी केली आहे. यावेळी त्या ‘ताराराणी’आघाडीतर्फे रिंगणात आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वीच्या नूल आणि आताच्या बड्याचीवाडी जि. प. मतदारसंघाचे विद्यमान सदस्य शिवप्रसाद तेली यांनाही यावेळी पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसत असले तरी त्यांचे चुलत बंधू संतोष तेली यांच्या पत्नी जयश्री तेली या भाजपतर्फे बड्याचीवाडी गणाची निवडणूक लढवित आहेत. यातून तेली बंधंूची पक्षावरील नाराजी स्पष्ट झाली आहे.
गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमरसिंह चव्हाण हे पक्षाचे पूर्णवेळ व लढाऊ कार्यकर्ते आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या पत्नी अरुंधती यांनाच पक्षाने भडगाव गटाची उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यामुळे अडचणीच्या काळात कुपेकरांच्या पाठीशी राहिलेले प्रकाश पताडे हे दुखावले गेले असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधातील गडहिंग्लज तालुका विकास आघाडीतर्फे पत्नी ज्योत्स्ना यांना रिंगणात उतरविले आहे.
चंदगड तालुक्यातील पूर्वीच्या कुदनूर आणि आताच्या माणगाव गटाच्या विद्यमान सदस्या सुजाता पाटील यांचे पती व चंदगड तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांचीही यावेळी माणगावमधून लढण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना डावलून कल्लाप्पा भोगण यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यासह अडचणीच्या काळात कुपेकरांना ताकद देणारे कोवाडचे इनामदार अशोकराव देसाई हेदेखील नाराज झाले आहेत.
१ ‘गडहिंग्लज’मध्ये भाजपच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रवादीने चंदगडमध्ये ‘भाजप’बरोबर युती केली आहे. त्यामुळे निम्म्या जागा भाजपला सोडाव्या लागल्या आहेत.
२ गेल्यावेळी आजरा तालुक्यातील कोळिंद्रे गटातील जि.प. व दोन्ही पं. स. सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले होते. यावेळी काँगे्रसच्या अंजना रेडेकर यांच्यासाठी जि.प.ची जागा सोडली असून, पं.स.च्या दोन्ही जागा राष्ट्रवादी लढवित आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती विष्णुपंत केसरकर आणि विद्यमान जि. प. सदस्या संजीवनी गुरव यांनी बंडखोरी केली आहे.
३ आमदार कुपेकरांनी यावेळी आपल्या बालेकिल्ल्यातील पंचायत समितीच्या दोन्ही जागा काँगे्रसला सोडल्या आहेत. तरीदेखील काँगे्रसने नूल व गिजवणे गटात राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.
४ गडहिंग्लजमध्ये विद्यमान जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली यांची भावजय जयश्री तेली या भाजपकडून बड्याचीवाडी गणाची निवडणूक लढवित आहेत.
काय घडले.. बिघडले..?