सत्तारूढ पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, भाजपला ‘नो एंट्री’
By Admin | Updated: April 4, 2015 00:07 IST2015-04-03T23:28:47+5:302015-04-04T00:07:23+5:30
‘गोकुळ’चे राजकारण : अंबरिष घाटगे यांची उमेदवारी नक्की, राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तारूढ गटावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

सत्तारूढ पॅनेलमध्ये राष्ट्रवादी, भाजपला ‘नो एंट्री’
राजाराम लोंढे- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमध्ये राष्ट्रवादीला सामावून घेण्यास पी.एन.पाटील यांनी केलेला विरोध व भाजपची मर्यादित ताकद यामुळे सत्तारूढ पॅनेलमध्ये या दोन्ही पक्षांना संधी मिळण्याची शक्यता नाही. राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण केले तरीही अंबरिष घाटगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
आमदार महादेवराव महाडिक यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे ठरविल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भाजपने दोन जागांची मागणी केली आहे. निवडणुकीपूर्वी काहीसे शांत असलेले राष्ट्रवादीचे नेते अर्ज दाखल करताना आक्रमक झाले. त्यांनी सर्वच गटांतून अर्ज भरून सत्तारूढ गटावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचा संजय घाटगे यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्यास तीव्र विरोध आहे. तोपर्यंत मंडलिक गटाच्या शिष्टमंडळाने सत्तारुढ गटाच्या नेत्यांची भेट घेऊन जागेची मागणी केली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी महाडिक यांची भेट घेऊन करवीरमधील एका जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे सत्तारूढ गटाच्या नेत्यांत अस्वस्थतेबरोबर तणावही वाढला असून पी. एन. पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकही जागा कोणाला द्यायची नाही, यावर पाटील ठाम आहेत. बुधवारी झालेल्या भेटीत त्यांनी महाडिक यांना तसे सांगितल्याचे समजते. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात दुखवायचे कोणाला अशी महाडिक यांची गोची झाली आहे. चंदगडमधून राजेश पाटील यांना संधी देऊन मंडलिक गटाला आपल्याबरोबर घेण्याचे प्रयत्न आहेत. सत्तेचा दबाव असल्याने भाजपला ‘स्वीकृत’चे गाजर दाखविले जाऊ शकते. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी सावध झाली असून, मुश्रीफ यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी शुक्रवारी कागल, चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांत चाचपणी केली. (प्रतिनिधी)
मंडलिक गटाच्या भूमिकेकडे लक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक गटाची भूमिका शनिवारी जाहीर होणार आहे. यासंबंधी हमीदवाडा
(ता. कागल) येथील मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रा. संजय मंडलिक नेमकी काय भूमिका जाहीर करतात, याविषयी जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे.
‘गोकुळ’साठी प्रा. संजय मंडलिक यांच्या गटाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघार घेण्याचा बुधवारी (दि. ८) अंतिम दिवस असल्याने पॅनेल बांधणीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली होती; पण सत्तारूढ गटाने या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नाही. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे जावई राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी द्यायची त्याबदल्यात मंडलिक गटाचा पाठिंबा घ्यायचा, अशी व्यूहरचना सत्तारूढ गटाची आहे; पण तशा तडजोडीस मंडलिक गट तयार नसल्याचे समजते. त्यामुळे ‘गोकुळ’सह सर्वच निवडणुकीतील आपली दिशा ठरविण्यासाठी मंडलिक गटाचा मेळावा हमीदवाडा येथे होत आहे. या मेळाव्यात प्रा. संजय मंडलिक काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘गोकुळ’बाबत भूमिका ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने रविवारी (दि. ५) दुपारी चार वाजता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या दोन्ही भूमिकांवर ‘गोकुळ’मधील घडामोडी अवलंबून आहेत. (प्रतिनिधी)
मुश्रीफ यांचा मान अन् अपमान
‘गोकुळ’च्या निवडणुकीत आमचा सन्मान नाही झाला तरी चालेल; पण अपमान होणार नाही याची काळजी आमदार महाडिक व त्यांच्या सहकार्याने घ्यावी, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी संताजी घोरपडे कारखान्याच्या कार्यक्रमात सांगितले. मुश्रीफ यांच्या या वक्तव्यामागे, ‘एकवेळ राष्ट्रवादीला जागा नाही दिली तरी चालेल; पण अंबरिष घाटगेंना घेऊन आमचा अपमान तरी करू नका, असाच अप्रत्यक्ष डाव आहे.
‘विक पॉँईट’ आडवे
आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाबरोबर चर्चा सुरू ठेवली आहे; पण काँग्रेसकडून एकही जागा पदरात पडणार नसल्याची खात्री कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे विरोधी गटाबरोबर जावे, असे बहुतांशी कार्यकर्त्यांना वाटते. पण, त्यासाठी आमदार मुश्रीफ व जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांचे ‘विक पाँर्इंट’ आडवे येत असल्याने पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे.
मुश्रीफ यांची गोकुळच्या ज्येष्ठ संचालकांशी चर्चा
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची आज, शुक्रवारी दुपारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ज्येष्ठ संचालकांनी कागलच्या शासकीय विश्रामधामवर भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. परंतु, ही भेट अनौपचारिक होती व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुश्रीफसाहेब सत्तारूढ गटाबरोबरच असल्याचा दावा या संचालकांनी भेटीनंतर केला.
‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ संचालक सर्वश्री अरुण नरके, विश्वास नारायण पाटील, रणजित पाटील हे शुक्रवारी दिवसभर कागल व राधानगरी तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ गटास पाठबळ द्यावे, यासाठी या दोन तालुक्यांतील प्रमुख नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. त्याचदरम्यान त्यांना मुश्रीफ हे कागलच्या विश्रामधामवर असल्याचे समजल्यावर हे सर्वजण तिथे गेले व त्यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. सुमारे अर्ध्यातासांहून अधिक काळ ही चर्चा सुरू होती; परंतु चर्चेचा तपशील समजू शकला नाही. नंतर या संचालकांशी संपर्क साधला असता, या भागात आम्ही होतो म्हणून सहज जाऊन मुश्रीफ यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
भुवया उंचावल्या...
राष्ट्रवादीला पॅनेलमध्ये जागा देण्यास पी. एन. पाटील यांचा विरोध आणि आमदार महादेवराव महाडिक यांना मानणाऱ्या संचालकांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केल्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.