गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी ‘जीवनधारा’स राष्ट्रीय मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:49+5:302021-09-09T04:30:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सुरक्षित रक्तसंकलनासह रुग्णांपर्यंत रक्त व रक्तघटक पोहोचवताना त्याची गुणवत्ता कोल्हापुरातील जीवनधारा रक्तपेढीने कायम ...

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी ‘जीवनधारा’स राष्ट्रीय मानांकन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सुरक्षित रक्तसंकलनासह रुग्णांपर्यंत रक्त व रक्तघटक पोहोचवताना त्याची गुणवत्ता कोल्हापुरातील जीवनधारा रक्तपेढीने कायम राखली आहे. बँकेने राष्ट्रीय मानांकनाचे सर्व निकषांचे पालन करीत दैनंदिन कामकाज केल्याने भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पडताळणीत पात्र ठरली आहे.
रक्ताचे संघटन आणि व्यवस्थापन, अत्याधुनिक उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी, बाह्यसेवा व पुरवठा, प्रक्रिया नियंत्रण, कमतरता आणि प्रतिकूल घटकांचा शोध, कामगिरी सुधारणा, दस्तऐवज नियंत्रण, रेकॉर्डस्, अंतर्गत लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन आढावा, अशा प्रकारे विविध गोष्टींतून रक्तपेढीचे कामकाज केले जाते.
भारतीय गुणवत्ता परिषदेने गेले वर्षभर रक्तपेढीची पडताळणी करण्यात आली. या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून सादर केलेल्या अंतिम अहवालानुसार भारतीय गुणवत्ता परिषदेतील (एनएबीएच) तज्ज्ञांच्या बैठकीमध्ये ‘जीवनधारा’स राष्ट्रीय मान्यता देण्यात आली.
‘जीवनधारा’ ही 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर चालवली जात असताना सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. 'सायकल रिसायकल' हा गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुकाचा विषय ठरला. प्रत्येक रक्तदात्यांच्या नावे वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, शैक्षणिक साहित्यवाटप, वचिंतांसोबत दिवाळी, कुष्ठरोग्यांना व ऊसतोड मजुरांना संसार उपयोगी साहित्य वाटप आदी कामे त्यांनी केली आहेत.
मानांकन मिळवणारी ‘जीवनधारा’ दुसरी
राष्ट्रीय मानांकन मिळवणारी जीवनधारा रक्तपेढी ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी आहे. यापूर्वी अर्पण रक्तपेढीला हा बहुमान मिळाला होता.
कोट-
गेली अकरा वर्षे काम करत असताना गुणवत्तेबाबत कोठेही तडजोड केली नाही. रक्ताचा थेट रुग्णांच्या जीवाशी संबध येत असल्याने काटेकोरपणे सर्व निकषांचे पालन केल्याने हा बहुमान मिळाला.
- प्रकाश घुंगूरकर (अध्यक्ष, जीवनधारा रक्तपेढी)