शिवाजी विद्यापीठात उद्या राष्ट्रीय परिसंवाद
By Admin | Updated: December 18, 2014 00:01 IST2014-12-17T23:24:45+5:302014-12-18T00:01:15+5:30
भौतिकशास्त्र विभागातर्फे आयोजन : मटेरियल सायन्स मुख्य विषय

शिवाजी विद्यापीठात उद्या राष्ट्रीय परिसंवाद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातर्फे ‘फिजिक्स आॅफ मटेरियल्स् अॅण्ड मेटरियल्स् बेस्ड डिव्हाईस फॅब्रिकेशन’ विषयावर शुक्रवारी (दि.१९) व शनिवारी (दि.२०) राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) डीएसएअंतर्गत होणाऱ्या परिसंवादात देशातील विविध संशोधक मटेरियल्स् सायन्समधील नवीन संशोधन, संकल्पना सादर करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार व संयोजक डॉ. राजीव व्हटकर यांनी आज, बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पवार म्हणाले, परिसंवादात नॅनो सायन्स्, नॅनो टेक्नॉलॉजी, पॉलिमर फिजिक्स, मॅग्नेटिक मटेरियलबाबत संशोधन व शोधनिबंध सादर होतील. भौतिकशास्त्र विभागाने संबंधित विषयांवर यापूर्वी एक आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय परिसंवाद घेतले आहेत. डॉ. व्हटकर म्हणाले, परिसंवादाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात मुंबईतील ‘आयआयजी’चे संचालक डॉ. डी. एस. रमेश यांच्या हस्ते होईल. यावेळी ‘युजीसी’च्या सायंटिफिक रिसर्च संस्थेचे केंद्र संचालक डॉ. व्ही. गणेशन, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार प्रमुख उपस्थित असणार आहेत. परिसंवादात प्रा. एस. के. चक्रवर्ती, पंकज पोतदार, राजेश कुमार, पी. एस. पाटील, एस. दत्त, एस. कौशिक, आर. आर. देशमुख आदी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय देशातील सुमारे दोनशे प्राध्यापक, संशोधक सहभागी होतील. त्यासह दक्षिण कोरिया आणि तैवानमधील प्राध्यापक शोधनिबंध सादर करतील. शनिवारी दुपारी मिठीबाई कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, डॉ. सी. डी. लोखंडे, पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)