निपाणीजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:29+5:302021-07-24T04:16:29+5:30
निपाणी : सलग ४ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णीनजीक पाणी आल्याने महामार्ग बंद केला आहे. ...

निपाणीजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद
निपाणी : सलग ४ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णीनजीक पाणी आल्याने महामार्ग बंद केला आहे. महामार्गावर दहा फुटांच्या आसपास पाणी असून यामुळे वाहतूक खोळंबली आहे. कोल्हापूरच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक लोक अडकून पडले आहेत.
निपाणीसह परिसरात व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने वेदगंगा, दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. यामुळे निपाणी तालुक्यातील अनेक गावांत सध्या पुराचे पाणी शिरले आहे. हजारो नागरिकांनी स्थलांतर केले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यास स्थानिक प्रशासनाने सुरुवात केली आहे.
गुरुवारी रात्रभर पावसाने उसंत न घेतल्याने राष्ट्रीय महामार्गावर मागुर फाट्यानजीक पाणी आले होते. मध्यरात्री ३ वाजता प्रशासनाने महामार्ग बंद करून वाहतूक रोखली. महामार्गावर एक ट्रक व चारचाकी वाहन अडकले होते. यातील ८ जणांना प्रशासनाने बाहेर काढले.
दरम्यान, निपाणी तालुका प्रशासनाने कोडणी, जत्राट, यमगर्णी, भिवशी, सिदनाळ, हुन्नरगी, कारदगा, मांगुर, बारवाड, ममदापूर येथे गंजी केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह अन्य अधिकरी पूरस्थितीची पाहणी करून नियोजन करत आहेत.
दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
२३ निपाणी रस्ता बंद
फोटो
निपाणी : राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली आहे.