नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:39:13+5:302014-10-05T00:48:58+5:30
सर्वाेच्च दर्जाची सुरक्षा

नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, रविवारी कोल्हापुरात येत असून, त्यांची तपोवन मैदानावर दुपारी पावणेदोन वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यांना देशातील सर्वाेच्च दर्जाची सुरक्षा असल्याने सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होईल. त्यामुळे कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
पाटील म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात कोल्हापूरसह सांगली, गोंदिया व नाशिक येथे जाहीर सभा होणार आहेत. त्यांची तासगाव (जि. सांगली) येथे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सभा होईल. त्यानंतर त्यांचे विमानाने कोल्हापूर विमानतळावर दुपारी दीड वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचे कडक सुरक्षा असलेल्या वाहनांच्या ताफ्यातून मोटारीने तपोवन येथे जाहीर सभास्थळी आगमन होईल. पावणेदोन वाजता त्यांचे भाषण सुरू होईल.
तत्पूर्वी, जाहीर सभेला दुपारी बारापासून सुरुवात होणार आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपाइं (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले, खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्थानिक नेत्यांची भाषणे होणार आहेत. यावेळी महेश जाधव, ‘रासप’चे यशवंत शेळके, राहुल चिकोडे, मिलिंद धोंड, सुभाष रामुगडे, आदी उपस्थित होते.