नरंदेच्या तरुणास डांबून मारहाण
By Admin | Updated: August 28, 2015 00:57 IST2015-08-28T00:57:40+5:302015-08-28T00:57:40+5:30
सांगलीतील घटना : व्याजाची रक्कम वसुलीसाठी कृत्य; सहाजणांवर गुन्हा; सावकारास अटक

नरंदेच्या तरुणास डांबून मारहाण
सांगली : व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्याच्या वादातून नरंदे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील संभाजी शिवाजी चव्हाण (वय २५) या तरुणास डांबून ठेवून मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सावकारासह सातजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सावकार समीर बाबासाहेब शेख (३४, रा. खणभाग, सांगली) याला अटक केली आहे. समीर शेख याच्यासह सागर शिंदे, प्रमोद शिंदे, बबन राऊत, कदम सोनार, परवेझ चिखलीकर (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
शेख हा परवानाधारक सावकार आहे. व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी त्याने संभाजी चव्हाण याची नियुक्ती केली होती. वसूल झालेली रक्कम तो संशयित शेखच्या बँक खात्यावर जमा करायचा. गेल्यावर्षीपासून त्याने ही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे शेखने त्याला जाब विचारला होता. यातून त्यांच्यात अनेकदा वादावादी झाली होती. यातून शेख व त्याच्या साथीदारांनी वसूल झालेले पैसे बँक खात्यावर का जमा केले नाहीस?, या कारणावरून सांगलीतील मार्केट यार्ड, तसेच फौजदार गल्ली येथे भाड्याने खोली घेऊन संभाजीला तेथे कोंडून ठेवून मारहाण केली. कोल्हापूर रस्त्यावर हॉटेल ‘साई डिलक्स’मधील एका खोलीतही संशयितांनी त्यास कोंडून ठेवून मारहाण केली होती. संशयितांनी वर्षभरात तीन ते चार वेळा संभाजीला डांबून ठेवून मारहाण केली आहे.
सावकाराला अटक
सातत्याने हा प्रकार घडू लागल्याने संभाजीने गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावकार शेखला अटक केली. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. पीआय आर. के. वाईकर पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)