नारायणराव बुधले यांचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST2021-02-07T04:22:12+5:302021-02-07T04:22:12+5:30
कोल्हापूर : श्री स्वामीभक्त, प्रसिद्ध उद्योजक, कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक, शाहू बँकेचे माजी अध्यक्ष अशा विविध ...

नारायणराव बुधले यांचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
कोल्हापूर : श्री स्वामीभक्त, प्रसिद्ध उद्योजक, कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक, शाहू बँकेचे माजी अध्यक्ष अशा विविध भूमिकांमध्ये सदैव कार्यरत असलेले नारायणराव बुधले हे आज रविवारी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.
आयएसओ प्रमाणित उद्योगाची उभारणी करणाऱ्या बुधले यांच्या कार्यकाळात शाहू बँकेचा विस्तार झाला. ज्ञानेश्वर हरि काटकरसाहेबांच्या सहवासामुळे त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्तमंडळाचे अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. स्वामीभक्तांच्या पाठबळावर उभारलेले सुंदर स्वामी मंदिर त्यांच्या कार्यपद्धतीचे निदर्शक आहे. या माध्यमातून रक्तदान, आरोग्य शिबिर, बालसंस्कार, योगवर्ग, अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असे उपक्रम राबवले जातात.
स्वामी प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने नामवंत प्रवचनकार, विचारवंत येतात. ज्ञानश्री ही शाळा चालवली जाते. गडचिरोलीतील आदिवासींसाठी कपडे संकलन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. सैनिक भरतीसाठीच्या तरुणांना अन्नदान करण्यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला. २००५ ते २०१० या पाच वर्षांत नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात उत्तम काम केले. आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी लक्ष्मी यांची साथ, मुले दीपक आणि सचिन यांनी घेत असलेले परिश्रम, सुना, नातवंडे अशा गोतावळ्यात समाधानी असणारे बुधले आता अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.
०६०२२०२१ कोल नारायणराव बुधले