नराधम पित्याला दहा वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: November 21, 2014 00:33 IST2014-11-21T00:21:08+5:302014-11-21T00:33:51+5:30
जिल्हा न्यायालयाचा निकाल : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नराधम पित्याला दहा वर्षे सक्तमजुरी
सातारा : स्वत:च्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड
अशी शिक्षा सुनावली. आज, गुरुवारी जिल्हा न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला.
याबाबत देण्यात आलेली माहिती अशी की, दि. ३ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी चारच्या सुमारास ही अत्याचाराची घटना घडली होती. सातारा तालुक्यात राहणाऱ्या व मूळ सोलापूर जिल्ह्यातील असणाऱ्या ३० वर्षीय पित्याने शाळेतून आपल्या अल्पवयीन नऊ वर्षांच्या मुलीला रेशनकार्डवर सही करायची आहे असे सांगून बोलावून घेतले होते. त्यानंतर दुचाकीवरून नेऊन तिच्यावर उसाच्या शेतात अत्याचार करण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास संबंधित मुलीने मावशी व आजीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात नराधम पित्याच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला.
या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयात लागला. पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी पित्याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न दिल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ऊर्मिला फडतरे यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे अविनाश पवार, आयुब खान, सुनील सावंत, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे बाळासाहेब घाडगे, वासंती वझे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)