नंदू आबदार ठरला ‘हालसिद्धनाथ केसरी’
By Admin | Updated: November 12, 2014 23:27 IST2014-11-12T22:11:28+5:302014-11-12T23:27:16+5:30
कुरणी कुस्ती मैदान : चटकदार १२५ कुस्त्या

नंदू आबदार ठरला ‘हालसिद्धनाथ केसरी’
मुरगूड : कुरणी (ता. कागल) येथील हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात न्यू मोतीबाग तालमीचा नंदकुमार आबदार याने अकलूजच्या नितीन केचेला पाचव्या मिनिटाला खाली खेचून बैठ्या स्थितीत बॅक थ्रो मारून अस्मान दाखवत हालसिद्धनाथ केसरीचा किताब पटकावला. प्रमुख वीस कुस्त्यांसह विविध वजनी गटात १२५ हून अधिक कुस्त्या झाल्या.
बाबूराव डोणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. दोन नंबरची कुस्ती न्यू मोतीबागचा मल्ल राजाराम यमगर व अकलूजचा बाबू मनपुरे यांच्यातील कुस्ती यमगरने जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती संतोष लवटे आणि राहुल सरक यांच्यात झाली. ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविली.
अन्य विविध वजनी गटात प्रवीण मांगोरे (मंडलिक आखार, मुरगूड), अरुण बोंगाडे (बानगे), शंकर चौगले (मोतीबाग), तानाजी खुराडे (शाहू साखर), अक्षय मंगवडे, विनायक पाटील (क्रि. प्रशिक्षण), बंडेराव सूर्यवंशी (पिंपळगाव), सागर इटके (कळंबा), ओंकार देसाई, मच्छिंद्र निऊंगरे (शाहू साखर), प्रशांत येरूडकर ( मुरगूड), प्रवीण निकम (व्हन्नूर), मुकुंद वाडकर (शाहूपुरी), विशाल पवार (शाहू साखर) यांनी विजय मिळविले.
विजेत्यांना राम सारंग, विनोद पाटील, धोंडिराम भारमल, चंदर पाटील, नारायण पाटील, शिवपुत्र पाटील, शामराव मांगोरे, भाऊसोा पाटील, बाळ संकपाळ यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत केली. तर पंच म्हणून राम माने, आनंदा गोधडे, सुरेश लंबे, शिवाजी जमनिक, अशोक फराकटे, आप्पा निकम, धनाजी हिरुगडे, अमर पाटील यांनी काम पाहिले. (वार्ताहर)