नाना घेणार विश्रांती, ताई लढणार 'गोकुळ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:46+5:302021-01-17T04:22:46+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याची यावेळची निवडणूक आपण लढवणार नाही. जिल्हा बँकेची महागडी निवडणूक आपल्याला परवडणारी नाही. ...

नाना घेणार विश्रांती, ताई लढणार 'गोकुळ'
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याची यावेळची निवडणूक आपण लढवणार नाही. जिल्हा बँकेची महागडी निवडणूक आपल्याला परवडणारी नाही. परंतु, आपली कन्या स्वाती कोरी यांना 'गोकुळ'च्या निवडणुकीला उभे करणार आहोत, असे सूतोवाच दस्तुरखुद्द ॲड. श्रीपतराव शिंदे यांनीच आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.
विद्यमान अध्यक्ष म्हणून गडहिंग्लज कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये कारखान्याच्या आगामी निवडणुकीतील आपल्या उमेदवारी संदर्भातही त्यांनी पहिल्यांदाच मतप्रदर्शन केले. यापूर्वी जनता दलाच्या प्रा.मीनाक्षी सोनाळकर 'गोकुळ'वर निवडून गेल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करून दिली.
२१ वर्षे आपण कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले. अनेकांना कारखान्यात रोजीरोटी दिली, ती काढून घेतली त्यावेळीही आपणच त्यांच्यासाठी लढलो. सत्तेत असो वा नसो नेहमीच शेतकरी-कामगारांसाठी लढत राहिलो. त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांसाठी आपणही रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
--------
चौकट :
गेल्यावेळी मुश्रीफांच्याबरोबर गडहिंग्लज कारखान्यात आघाडी केलेल्या शिंदेंची भूमिका यावेळी काय राहणार, याची उत्सुकता होती. परंतु, खुद्द शिंदेंनीच (नाना) आपण यावेळी लढणार नसल्याचे सांगितले. प्रा.कोरी (ताई) कारखान्याच्या राजकारणातून गेल्यावेळीच बाजूला झाल्या .त्यामुळे शिंदेंची नवी चाल काय राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहील.