खुल्या जागांना लागणार महापालिकेचे नाव; नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:40+5:302021-09-18T04:25:40+5:30
कोल्हापूर : अंतिम रेखांकन मंजूर करताना संबंधित मिळकतधारकांनी दिलेल्या खुल्या जागांवर आता कागदोपत्री महानगरपालिकेचे नाव लावण्याची विशेष मोहीम हाती ...

खुल्या जागांना लागणार महापालिकेचे नाव; नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
कोल्हापूर : अंतिम रेखांकन मंजूर करताना संबंधित मिळकतधारकांनी दिलेल्या खुल्या जागांवर आता कागदोपत्री महानगरपालिकेचे नाव लावण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. अशा खुल्या जागांवर अतिक्रमणे झाली असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन महापालिका नगररचना विभागाने शुक्रवारी केले.
कोल्हापूर शहरातील अंतिम रेखांकन मंजूर झाल्यानंतर संबंधितांना त्या रेखांकनातील खुल्या जागा महापालिकेस द्यायच्या असतात. काही जागा महापालिकेकडे वर्ग झाल्या, तर काही जागा अद्यापही वर्ग झालेल्या नाहीत. अशा खुल्या जागांवर कागदोपत्रकी नाव नोंदणी करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना दिले आहेत.
महापालिकेच्या खुल्या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे तसेच काही जागा मूळ मालकांच्याच ताब्यात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. म्हणूनच ही अतिक्रमणे काढण्याची तसेच नावे लावण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्या ज्या भागात अशा जागा असतील तेथील नागरिकांनी नगररचना विभागाला माहिती दिल्यास त्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत. माहिती उपलब्ध होताच खुल्या जागांवरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
नागरिकांना अतिक्रमणाच्या तक्रारी द्यायच्या असतील, तर त्या ९१५८५३५३२० या व्हॉटस्-ॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.
पॉईंटर -
- शहरात पालिकेच्या मालकीच्या ७४० खुल्या जागा
- त्यापैकी ३४० जागांवर पालिकेच्या नावाची नोंद
- उर्वरित जागांवर नावे लावण्याची प्रक्रिया सुरू.
- अतिक्रमणाबाबत माहिती देण्याचे आवाहन