प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी नावे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:36+5:302021-08-21T04:27:36+5:30

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश ...

Name the lands allotted to the project victims | प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी नावे करा

प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनी नावे करा

धामोड : राधानगरी तालुक्यातील तुळशी मध्यम प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मंत्रालय, मुंबई येथे दि. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये केली.

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी मध्यम प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन १९६५ ते ६६ च्या दरम्यान करण्यात आली. त्यावेळी राधानगरी तालुक्यातील तुळशी खोरा हा प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही पाण्यापासून वंचित होता; यामुळे धामोड येथे तुळशी प्रकल्पाचे काम सुरू झाले. याकरिता शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ४० वर्षांपूर्वी देवस्थानच्या जमिनी ११ महिन्यांच्या करार पद्धतीने कसण्याकरिता वाटप केल्या होत्या; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींवर कर्जे काढणे, त्यांची खरेदी अथवा विक्री करणे यांसह अन्य खासगी कामाकरिता वापरता येत नव्हत्या. यामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सदरील जमिनी बदलून अथवा नावे करण्याबाबतची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली होती. याबाबत वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या; परंतु तोडगा निघत नसल्याने प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार आबिटकर यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन सदरील बाब मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, तुळशी प्रकल्पग्रस्तांना तत्कालीन वेळी जमिनी वाटप करतेवेळी सदरील जमिनी या देवस्थान असल्याबाबत शहनिशा न करता वाटप करण्यात आल्या असाव्यात. यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा कोणताही दोष नाही; परंतु आज याबाबत जर धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असल्यास सदरील जमीन वर्ग-२ वरून वर्ग -१ कराव्या लागतील; याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास पाठवून द्यावा. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तुळशी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Name the lands allotted to the project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.