मंगळ ग्रहावर कोरले जाणार कुंभोजच्या धनगरी ढोलवादकाचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:57+5:302021-02-05T07:01:57+5:30
कुंभोज : (अशोक खाडे) ...

मंगळ ग्रहावर कोरले जाणार कुंभोजच्या धनगरी ढोलवादकाचे नाव
कुंभोज : (अशोक खाडे) कला मग ती कोणतीही असो. ती कलाकाराला वेगळी ओळख देते. पैसा आणि प्रसिद्धीही देते. पण, ती कुठेपर्यंत जास्तीत जास्त सातासमुद्रापार. पण कुंभोज (ता. हातकणंगले) येथील शिवाजी केरबा पालखे यांचे नाव त्यांच्याकडील धनगरी ढोलवादन कलेने चक्क मंगळ ग्रहावर पोहचविले जाणार आहे. नासाकडून त्यांना तसे प्रशस्तीपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविलेले कुपवाड (जि. सांगली) येथील मुरसिद्ध वालुग व ओवीकार मंडळाने डॉ. पैलवान बाळासाहेब मंगसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक धनगरी ढोलवादन व कैताळ वादन या कलेचे जगातील चौदा देशांत सादरीकरण केले आहे. या मंडळाच्या चाळीस सदस्यांपैकी कुंभोजचा शिवाजी एक पट्टीचा धनगरी ढोलवादक. विविध देशांत मुरसिद्ध ओवीकार मंडळाने मिळविलेल्या ख्याती तसेच पारंपरिक ढोलवादन कलेची अमेरिकास्थित नासाने दखल घेतली. २०२६ मध्ये नासाच्या नियोजित मंगळ मोहिमेसाठी निवडलेल्या जगातील चौदा शास्त्रज्ञांसोबत कुपवाडच्या बाबासाहेब मंगसुळे यांची निवड झाली आहे. मंगळ मोहिमेदरम्यान धनगरी ढोल व कैताळ वादनाच्या ध्वनीचे संशोधन होणार आहे. या पार्श्वभूमीवर नासाकडून मुरसिद्ध ओवीकार मंडळाच्या सर्वच सदस्यांना प्रशस्तिपत्र प्राप्त झाले आहे. चाळीस सदस्यांचे प्रतिनिधित्व म्हणून डॉ. मंगसुळे मंगळावर जाणार तसेच शिवाजीसह सर्व कलाकारांचा परिचय नासामार्फत मंगळ ग्रहावर झळकणार असून, या आनंदाने कुंभोजच्या शिवाजी पालखे यांना गगनचुंबी आनंद झाला आहे. केवळ शिवाजीच्या निमित्ताने कुंभोज गावाचेही नाव मंगळावर पोहचणार असल्याचा सार्थ अभिमान कुंभोजवासीयांना वाटत असून, शिवाजी पालखे यांचे याबद्दल कुंभोजसह पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी-
१) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील शिवाजी पालखे धनगरी ढोलवादन सादर करताना.
२) नासाकडून नुकतेच शिवाजी पालखे यांना ई-मेलद्वारे मिळालेले प्रशस्तिपत्र.