भाजपचे नाव घेऊन सुरू आहे लुबाडणूक
By Admin | Updated: January 10, 2016 01:00 IST2016-01-10T01:00:49+5:302016-01-10T01:00:49+5:30
पक्षाने घेतली दखल : फेरीवाले जिल्हाध्यक्ष निघाले बोगस

भाजपचे नाव घेऊन सुरू आहे लुबाडणूक
कोल्हापूर : राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे सांगून काहीजण लोकांची लुबाडणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा लोकांबद्दल कुणास माहिती असल्यास अथवा कुणाची तक्रार असल्यास तातडीने पक्षाच्या शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.
‘भाजपच्या फेरीवाले संघटनेचा जिल्हाप्रमुख’ म्हणून अंबाई टँक परिसरात राहणाऱ्या किशोर माळी ऊर्फ महाराज याने स्वत:च्या मारुती व्हॅनवर मागील बाजूस तसे चक्क लिहिलेच होते. माळी यांचा पक्षाशी काडीमात्र संबंध नाही.
भाजपच्या फेरीवाले संघटनेचे गेली अनेक वर्षे प्र. द. गणपुले हे काम करतात, परंतु त्यांनी कुठेच फलक लावलेला नाही; परंतु माळी यांनी मोटारीवरच तसा फलक लावला. त्याशिवाय त्यांच्याबद्दल
पक्षाच्या कार्यालयाकडे तक्रारीही आल्यामुळे त्याची दखल पक्षाने घेतली आहे.
माळी हे पदाचे भय दाखवून अनेक सरकारी कार्यालयांत, फेरीवाल्यांमध्ये दुरुपयोग करीत आहेत. त्यांचा पक्षाशी दुरान्वयेही संबंध नाही. त्यांच्या नेमणुकीचे कोणतेही अधिकृत पत्र पक्ष कार्यालयातून त्यांना देण्यात आलेले नाही. या व्यक्तीकडून पक्षाचे नाव घेऊन कोणतेही गैरप्रकार होत असतील तर त्वरित पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाने केले आहे. कोणतीही अडचण असल्यास पक्षाचे सरचिटणीस अशोक देसाई, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, विजय जाधव, संदीप देसाई, हेमंत आराध्ये व अमोल पालोजी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पक्षाने केले आहे.
भाजपचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे असे सांगून जर कोणी धमकावत असेल, त्रास देत असेल तर पक्षातील बिंदू चौकातील कार्यालयाशी संपर्क साधावा व तक्रार करावी, असे आवाहन अध्यक्ष जाधव यांनी केले.