एन. डी. पाटील यांच्यासारख्यामुळेच जगात आशेला जागा

By Admin | Updated: May 10, 2015 01:10 IST2015-05-10T01:10:03+5:302015-05-10T01:10:03+5:30

प्रकाश आमटे : एन. डी. पाटील यांना सा. रे. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान; ‘मी सा. रे. पाटील बोलतोय’ पुस्तकाचे प्रकाशन

N. D. The only hope for the world is that of Patil | एन. डी. पाटील यांच्यासारख्यामुळेच जगात आशेला जागा

एन. डी. पाटील यांच्यासारख्यामुळेच जगात आशेला जागा

जयसिंगपूर : जगातील सर्व लोकांनी स्वत:पासूनच बदल घडविण्याची सुरुवात केली, तरच जग सुखी होईल. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासारखी माणसे जोवर जगात आहेत, तोवर आशेला जागा आहे, असा आशावाद डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला.
कै. डॉ. सा. रे. पाटील स्मृती समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल होते. एक लाख एक हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मी सा. रे. पाटील बोलतोय, या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले. कार्यक्रमास आमदार उल्हास पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, श्री दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अशोक कोळेकर प्रमुख उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना एन. डी. पाटील म्हणाले, जी माणसे रुळलेल्या, मळलेल्या वाटेवरुन चालण्याचे नाकारतात तीच समाजापुढे आदर्श निर्माण करतात. कै. सा. रे. पाटील असेच आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार मी विनयाने स्वीकारतो. डॉ. प्रकाश आमटे व जब्बार पटेल या सामाजिक व कला क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्य आहे. पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी संस्थेला प्रदान करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रबोधिनीच्या प्रसाद कुलकर्णी यांनी रकमेचा धनादेश स्वीकारला.
जब्बार पटेल म्हणाले, आयुष्याची वाटचाल करताना आपल्याला कोण भेटते, यावर जीवनाची दिशा ठरते. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला जात आहे ते कै. सा. रे. पाटील व ज्यांना पुरस्कार मिळाला ते प्रा. एन. डी. पाटील यांना आयुष्यात निरलस, समाजाभिमुख आणि समाजाचे भले करण्याची तळमळ असणारी
माणसं भेटली, म्हणूनच ते घडले.
नगराध्यक्षा सुनीता खामकर यांनी स्वागत केले. विनोद शिरसाट यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. मानपत्राचे वाचन सर्जेराव पवार यांनी केले. मंदा आमटे, सरोज पाटील, तेजश्री सातपुते-रक्ताडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, शेखर, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव बी. बी. शिंदे, ल. क. अकिवाटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: N. D. The only hope for the world is that of Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.