गडहिंग्लज : शहरातील घाळी कॉलनीत राहणाऱ्या वैशाली आनंद कोठावळे (वय ४४) व अवधूत आनंद कोठावळे (वय १८) रा. मूळगाव कोगे ता. करवीर, सध्या रा. गडहिंग्लज या माय लेकरांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी (२३) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, आनंद मधुकर कोठावळे हे गडहिंग्लज तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. वैशाली या त्यांच्या पत्नी व अवधूत हा मुलगा आहे. ते बुधवार (२०) पासून दोन दिवस कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बाहेरगावी असताना त्यांनी घरी फोन केले;परंतु घरचे त्यांचा फोन उचलत नव्हते.
दरम्यान, शुक्रवारी (२३) रात्री ते घरी परत आले; परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची मदत घेऊन दरवाजा उघडला. आत गेल्यानंतर घरातील हॉलमधील पंख्याला दोरी बांधून मुलगा अवधुत आणि वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये पंख्याला ओढणी बांधून पत्नी वैशाली हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी (२२) रात्री ८ ते शुक्रवारी रात्री ९ च्या दरम्यान दोघांनी राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही; परंतु कौटुंबिक वादाच्या कारणावरून त्या दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंचनामा झाल्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
आनंद कोठावळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस हेडक्वाॅन्स्टेबल पाटील अधिक तपास करत आहेत.
* शहरासह तालुक्यात हळहळ......!
ग्रामसेवक कोठावळे यांच्या पत्नी व मुलाने दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची घटना घडली.
पत्नी आणि एकुलत्या मुलाच्या मृत्युमुळे एका सुशिक्षित कुटुंबावर असा वाईट प्रसंग ओढवला. त्यामुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
* डॉक्टर व्हायचे स्वप्न राहिले अधुरेच.....!
अवधुत याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्याच्या आई-वडिलांचीदेखील आपला मुलगा डॉक्टर व्हावा, अशी इच्छा होती. १२ वी नंतर वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी तो कोटा (राजस्थान) येथे राहिला होता; परंतु त्याच्या जाण्याने त्याचे डॉक्टर व्हायचे स्वप्न अधुरेच राहिले.
फोटोअोळी : वैशाली कोठावळे