माझ्या नियमाने काम चालेल, तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही....
By Admin | Updated: June 30, 2015 00:27 IST2015-06-30T00:27:48+5:302015-06-30T00:27:48+5:30
--जिल्हाधिकारी कार्यकर्त्यांवर भडकले

माझ्या नियमाने काम चालेल, तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही....
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे अगोदर शांतपणे जाणून घेणे, हे खरे तर जिल्हाधिकाऱ्यांचे काम असते. परंतु, सोमवारी कोल्हापूरकरांना याच्या उलटा अनुभव तर आलाच, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वभावाचेही दर्शन झाले. हद्दवाढ होण्यासाठी निवेदन द्यायला गेलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना उद्देशून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी, ‘इथे माझ्या नियमाप्रमाणे काम चालेल, मी काही तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही’, अशा शब्दांत कानउघाडणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते चकित झाले.
सोमवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांना भेटण्यासाठी पूर्व परवानगीने गेले होते. भेटीची वेळ सकाळी दहा वाजताची दिली होती. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी अकरा वाजता कार्यालयात आले. दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांची संख्या दीडशेच्या आसपास असल्याचे पाहून ताराराणी सभागृहात बसण्याचा सल्ला काही कर्मचाऱ्यांनी दिला. त्यानुसार कार्यकर्ते ताराराणी सभागृहात बसले. तोपर्यंत सकाळी अकराची वेळ दिल्याप्रमाणे हद्दवाढ विरोधी कृती समितीचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पोहोचले.
त्यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटांत चर्चा झाली. सर्व कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर पडले. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असणारे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, बाबा पार्टे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात गेले.
त्यांनी कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहात येण्याची विनंती केली. त्यावेळी डॉ. सैनी यांनी त्यास ठाम नकार दिला. सर्वच कार्यकर्त्यांना येथे बसता येणे अशक्य आहे, असे आर. के. पोवार म्हणताच जिल्हाधिकारी डॉ. सैनी भडकले. ‘इथे मी नियम केलेत. माझ्या नियमाप्रमाणे काम चालेल, मी काही तुम्हाला पाहुणे म्हणून बोलविलेले नाही. तुम्ही मला भेटायला आला आहात. लोक जास्त असतील, तर बाहेर थांबतील. मी काही सर्वांना बसायला खुर्ची देऊ शकत नाही’, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.
त्यामुळे काहीसे नाराज होऊन आर. के. पोवार कार्यकर्त्यांना बोलावतो म्हणून कक्षातून बाहेर पडले. नेमक्या याचवेळी तेथे उपस्थित असलेले बाबा पार्टे जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, साहेब बऱ्याचवेळा आम्ही ताराराणी सभागृहात बसलो. तेथे जिल्हाधिकारी यायचे, चर्चा करायचे. त्यामुळे तुम्ही यायला काहीच हरकत नव्हती’. बाबांचे हे बोलणे ऐकून जिल्हाधिकारी आणखी भडकले. ते म्हणाले, हे कलेक्टर आॅफिस आहे. कलेक्टरांसमोर बसला आहात. मोठ्या आवाजाने बोलण्याचे काहीच कारण नाही, आधी खाली आवाजात बोला’, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
शेवटी बाबा पार्टेही संतप्त झाले. ते म्हणाले, शहरात एखादी घटना घडली की जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आम्हाला गाड्या घेऊन घरे शोधत बोलवायला येतात, आम्हीही येतो.
प्रशासनाला मदत करतो. त्यामुळेच सभागृहात येऊन आमचे म्हणणे ऐकावे असा आमचा आग्रह होता, त्यात काय चुकले’. तेव्हा डॉ. सैनी यांनी महेश जाधव यांच्याकडे बघत ‘जाधव यांना जरा समजावा’ असे सांगितले. तणावाच्या वातावरणात बैठक सुरू झाली. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी समंजसपणा दाखवत मला माफ करणार की नाही, अशी विचारणा कार्यकर्त्यांकडे करीत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसले. (प्रतिनिधी)