संपली माझी पंचगंगा...संपला रंकाळा

By Admin | Updated: May 7, 2015 00:45 IST2015-05-07T00:44:58+5:302015-05-07T00:45:34+5:30

नदीला जलपर्णीची मगरमिठी : रंकाळ््यात सांडपाणी मिसळल्याने हजारो मासे मृत; दोन्ही ठिकाणांच्या जैवविविधतेला घरघर

My Panchganga is over, I'm finished | संपली माझी पंचगंगा...संपला रंकाळा

संपली माझी पंचगंगा...संपला रंकाळा

कोल्हापूर : जलपर्णीने कोल्हापूरची जीवनदायीनी असणाऱ्या पंचगंगा नदीला आपल्या कराल दाढेत आवळले असतानाच प्रदूषित पाण्याने रंकाळ््यातील माशांचा आज जीव गेला. वळवाच्या पावसामुळे मंगळवारी रात्रभर इराणी खणीसह आसपासच्या परिसरातील सांडपाणी रंकाळ्यात मिसळले. परिणामी पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने संध्यामठ परिसरात हजारो मासे मृत झाले. एकीकडे साखर कारखान्यांसह इचलकरंजीतील सायझिंग, प्रोेसेस तसेच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त सांडपाणी सतत मिसळल्याने पंचगंगा शेवटची घटका मोजत आहे. या पाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याखाली नदीचा श्वास गुदमरत आहे. तर दुसरीकडे रंकाळा तलावात शहरातील सांडपाणी मिसळल्याने दूषित पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने संध्यामठ परिसरात हजारो मासे मृत झाले. बुधवारी सकाळी श्वासोच्छ्वासास त्रास होऊ लागल्याने अनेक मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तडफडू लागले. अवघ्या दोन तासांत मेलेल्या माशांचा खच काठावर साचला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पंचगंगा आणि रंकाळ्याची वाताहात झाल्याचा संताप पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.
रंकाळा परिसरातील शाम सोसायटी व साने गुरुजी वसाहत, आदी परिसरातील तब्बल १० दशलक्ष लिटर दूषित पाणी गेली अनेक वर्षे रंकाळ्यात मिसळते. गेल्या सहा महिन्यांपासून यातील नऊ दशलक्ष लिटर पाणी इतरत्र वळविण्यात यश आल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, अद्याप मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्याचे चित्र आहे.
इराणी खणीचा गाळ काढून ते पाणी पाईपमध्ये सोडल्याने गाळ साचून सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईनची क्षमता कमी झाली आहे. मंगळवारी शहरात झालेल्या वळवाच्या पावसामुळे इराणी खणीतील दूषित पाणी व गाळ पुन्हा रंकाळ्यात गेला. यापूर्वी इराणी खणीसह परताळ्यातील सांडपाणी अडविण्यासाठी रंकाळ्यात मध्येच वाळू व मातीची पोती भरून कच्चा बांध घालण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे हा बांध नष्ट झाला आहे. यातच वळवाच्या पावसामुळे इराणी खणीसह परिसरातील आलेले दूषित पाणी मोठ्या प्रमाणात रंकाळ्यात मिसळले. या दूषित पाण्यामुळेच मासे मेल्याचा दावा आरोप आरोप पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी केला आहे.


नैसर्गिक पुनर्भरण कधी ?
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी बंद करणे गरजेचे आहे. हे मिसळणारे पाणी बंद झाले तरी रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. पुनर्भरण झाल्याखेरीज रंकाळ्याचे दुखणे कमी होणार नाही. प्रशासकीय उदासीनता रंकाळ्याच्या मुळावर उठली असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.


आॅक्सिजनची मात्रा घटली
पाण्यातील प्रतिलिटर मिलिग्रॅममध्ये असणारे विरघळलेल्या आॅक्सिजनचे प्रमाण (डी.ओ.) हे त्या पाण्याची शुद्धता ठरविते. सहा ते सातपर्यंतचा डी.ओ. जैवविविधतेसाठी फायद्याचा असतो. रंकाळ्यात दूषित पाणी मिसळल्याने डी. ओ. तीनपेक्षा कमी झाला. परिणामी आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने मासे मृत झाल्याच अभ्यासकांनी सांगितले.


पाण्यातील आॅक्सिजन कमी होऊन मासे मेल्याचा दावा मंडळ व महापालिका करत आहे. मात्र, इराणी खणीतील गणेशमूर्तींचे अवशेष बाजूला काढल्याने तो गाळ पावसामुळे रंकाळ्यात मिसळला. परिणामी पाण्यातील रासायनिक विषारी घटक वाढल्याने मासे मृत झाले. मंडळाच्या सदस्य सचिवांकडे तक्रार करणार आहे.
- उदय गायकवाड (पर्यावरण तज्ज्ञ)

Web Title: My Panchganga is over, I'm finished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.