वडगाव पालिका सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:45+5:302021-03-27T04:25:45+5:30

पेठवडगाव : चिकन गुनिया,डेंग्यूची साथ,नामकरण,शौचालय अनुदान वर्ग आदी वर नगरसेवकांनी प्रशासन,व नगराध्यक्ष यांना कोंडीत पकडून प्रश्नांचा भडिमार केला. तर ...

Mutiny at Wadgaon Municipal Council meeting | वडगाव पालिका सभेत गदारोळ

वडगाव पालिका सभेत गदारोळ

पेठवडगाव : चिकन गुनिया,डेंग्यूची साथ,नामकरण,शौचालय अनुदान वर्ग आदी वर नगरसेवकांनी प्रशासन,व नगराध्यक्ष यांना कोंडीत पकडून प्रश्नांचा भडिमार केला. तर संतप्त नगरसेवक संदीप पाटील यांनी कागदपत्रे सभागृहात भिरकावून सभात्याग केला. तसेच सभागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.

वडगाव नगरपालिकेची सभा महालक्ष्मी मंगलधाम येथे सोशल डिस्टन्स पाळून झाली. या सभेत विषय पत्रिकेवरील नऊ तर आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.

आजच्या सभेत माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी मंगरायाची वाडी फाटा स्मशानभूमी जवळ कोणी राहत नसताना जलवाहिन्या टाकण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच डेंग्यू ,चिकन गुनियाची साथ पसरली असून योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. जनतेचे नगराध्यक्ष असतात,असे म्हणत सर्व प्रभागात समतोल विकास करावा असे आवाहन केले. आम्ही सत्तेवर असताना संभाजी उद्यानाच्या सुशोभीकरण कामासाठी जोरदार पाठपुरावा केल्याची आठवण करून देत आचारसंहितेच्या काळात निधी मिळाल्याचे सभागृहात सांगितले.

संदीप पाटील यांनी गत तीन वर्षाच्या ऑडिट मुद्द्यावर बोट ठेवून पालिकेचे ८९ लाखांचे नुकसान झाले असून यासंदर्भात काय कार्यवाही केली. विकास कामे करताना काम एकाच्या नावावर करतोय दुसरा..! असा प्रकार मोठ्या प्रमाणात पालिकेमध्ये सुरू आहे. त्यामुळे कामांचा दर्जा व गुणवत्तापूर्ण कामे होत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या सर्व विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडिट मागणी करून ही दखल घेत नाही. याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

त्याचबरोबर पाटील यांनी शौचालयाचे अनुदान गणेश तलाव सुशोभीकरणासाठी निधी परस्पर वर्ग केल्याचा आरोप सभागृहात केला. त्यामुळे खळबळ उडाली. दोन्ही कामे अर्धवट राहिल्यामुळे सामान्यांची निधी अभावी शौचालये अपुरी राहिली आहेत.

सध्या सोशल मीडियावर भाजी मंडईच्या नामकरणाबाबत चर्चा सुरू आहे. याकडेही संदीप पाटील यांनी लक्ष वेधले.

या नामकरणास विरोध नाही. मात्र वाद उपस्थित होत असल्याने आपल्या युवक क्रांती आघाडीची बदनामी होत आहे.स्व शिवाजीराव सालपे यांच्या नावे भव्यदिव्य विधायक नावीन्यपूर्ण काम करून नाव द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अजय थोरात यांनी या सभेत ही बेकायदेशीर पाणी कनेक्शनचा प्रश्न पोटतिडीकीने मांडला. पालिकेचे आर्थिक नुकसान होत असताना याकडे पाणीपुरवठा विभागाचे मुद्दाम दुर्लक्ष करतोय का? योग्य ती ठोस कारवाई करावी अशी मागणी केली.

नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी पालिकेच्या १३५ वर्षांच्या पालिकेच्या जागा नावावर होण्यासाठी चार वर्ष पाठपुरावा केला आहे. तसेच पूर्वीचे कोणतेही नाव बदलून भाजी मंडईतील दुकान गाळ्याचे नाव रद्द केलेले नाही. अशी कागदपत्राचे वाचन करून स्व. सालपे यांचे नाव दिल्याचे सांगितले.

आजच्या सभेत गुंठेवारी २००१ प्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय ही घेण्यात आला.

या सभेत विद्या पोळ,संदीप पाटील, अजय थोरात, कालिदास धनवडे,गुरुप्रसाद यादव,

उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, संतोष गाताडे ,शरद पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी गटनेत्या प्रविता सालपे,सुनीता पोळ, मैमुन कवठेकर, शबनम मोमीन, नम्रता ताईगडे,संगीता मिरजकर, अनिता चव्हाण आदी उपस्थित होते.

चौकट

शहरातील सुधारित विकास आराखड्यातील ग्रीन झोनमधील आरक्षण उठविण्याचे रॅकेट सक्रिय झाले आहे.तसेच जनतेच्या प्रश्नांची तीन वर्ष मागणी करून दखल घेतली जात नाही. यावरून नगराध्यक्ष व संदीप पाटील त्यांच्यात वातावरण तापले. अखेर पाटील यांनी मागण्यांचे कागदपत्रे सभागृहात भिरकावून निषेध व्यक्त करुन सभात्याग केला. आजपर्यंत पाटील यांनी दुसऱ्या वेळेस निषेध करत सभात्याग केला.

Web Title: Mutiny at Wadgaon Municipal Council meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.