मुस्लिमांनी स्वबळावर विकास साधावा
By Admin | Updated: May 25, 2015 00:32 IST2015-05-24T23:48:05+5:302015-05-25T00:32:56+5:30
एन. एन. मालदार : ‘हाँ, मुमकीन हैं’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

मुस्लिमांनी स्वबळावर विकास साधावा
कोल्हापूर : मुस्लिम समाजाला आरक्षणाची आपण मागणी करीत आहोत. मात्र, मुस्लिम समाजाने स्वबळावर विकासाचा प्रयत्न केला पाहिजे. समाजाने उच्चशिक्षणाची जोड देऊन हा विकास सहज साधता येईल, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी रविवारी केले. शाहू स्मारक भवन येथे सेंटर फॉर रेनेसॉतर्फे लेखक हुमायून मुरसल लिखित ‘हाँ, मुमकीन हैं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पुण्याचे आर.जी.सी. फोरमचे संचालक डॉ. के. जी. पठाण अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रोसेस रिइंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रेसिडेंट डॉ. बी. ए. मुजावर, उद्योगपती सलाउद्दीन ठाकूर उपस्थित होते. यावेळी ‘हाँ, मुमकीन हैं’ या पुस्तकाचे व महात्मा गांधी मुस्लिम युनिव्हर्सिटी माहितीपत्रिकेचे प्रकाशन झाले.
मालदार म्हणाले, उच्चशिक्षण आणि संशोधन या दोन गोष्टी आत्मसात केल्यास माणसांचा नक्कीच विकास होतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त जुजबी शिक्षण न घेता उच्चशिक्षण घेतले पाहिजे. आपल्या शिक्षणातून नवीन संशोधन करावे. हे संशोधन समाजाभिमुख असले पाहिजे. भविष्यात तुम्ही उच्चशिक्षण घेतलं तरच निभाव लागेल. मुस्लिम समाजातील २५ टक्के मुले शालेय शिक्षण घेत नाहीत, तर ९५ टक्के मुले उच्चशिक्षण घेत नाहीत. ही परिस्थिती बदलली तरच समाजाचा विकास होईल.
डॉ. मुजावर म्हणाले, आजच्या शिक्षणामुळे मनुष्य फक्त साक्षर होतो. सुशिक्षित नाही. अनेकांकडे पदवी आहे; मात्र नोकरी नाही, ही परिस्थिती आहे. शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की, गरिबांचे तर सोडून द्या; पण मध्यमवर्गीय लोकांच्या हातातूनसुद्धा आता शिक्षण लांब जाऊ लागले आहे.
लेखक मुरसल म्हणाले, सहकार तत्त्वावर लोकसहभागातून २१ व्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मिशन महात्मा गांधी मुस्लिम युनिव्हर्सिटी २०२० आणि सेंटर फॉर रेनेसॉ २०१७ सुरू होत आहेत. या दोन शैक्षणिक आणि संशोधन संस्था मुस्लिमांच्या विकासाचे नवे मॉडेल होतील. प्रत्येक मुस्लिमाला विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करण्याच्या व आधुनिक शिक्षणाद्वारे प्रगत औद्योगिक मुस्लिम समाज घडविण्याचा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सामाजिक प्रयोग आहे.
याप्रसंगी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर, डॉ. गेल आॅग्वेट, सेंटर फॉर रेनेसॉ अध्यक्ष हाशीमभाई मनगोळी, उपाध्यक्ष एम. बी. शेख, शौकत मुतवल्ली, मोहम्मदहनिफ काझी, मुबारक शेख, अब्दुलरशीद बागवान यांच्यासह नागरिक उपस्थित होते. समीर बागवान यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)