मुस्लिम-मराठ्यांत भांडण लावण्याचा सरकारचा डाव

By Admin | Updated: March 14, 2015 00:18 IST2015-03-14T00:18:33+5:302015-03-14T00:18:49+5:30

मुरसल यांचा आरोप : आरक्षणप्रश्नी गडहिंग्लजला मुस्लिम बांधवांचा मोर्चा

Muslim-Maratha fight against government | मुस्लिम-मराठ्यांत भांडण लावण्याचा सरकारचा डाव

मुस्लिम-मराठ्यांत भांडण लावण्याचा सरकारचा डाव

गडहिंग्लज : मुस्लिमांना दिलेले आरक्षण काढून घेऊन मराठा व मुस्लिम समाजात भांडण लावण्याचा किंबहुना मुस्लिम बांधवांपासून मराठा समाजाला तोडण्याची चाल सरकार करत आहे, असा आरोप ‘हिंदी है हम..हिंदोस्ता हमारा’ परिषदेचे संस्थापक कॉ. हुमायून मुरसल यांनी शुक्रवारी केला.‘हिंदी है हम..हिंदोस्ता हमारा’ परिषदेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे येथील प्रांतकचेरीवर मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
मुरसल म्हणाले, आजअखेर मुस्लिम समाजाने काँगे्रसलाच मते दिली. मात्र, केंद्रात व राज्यात काँगे्रस आघाडीचे सरकार असतानादेखील मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही. हक्काच्या आरक्षणाचा हा अध्यादेश नव्याने काढावा यासाठी राज्यभर प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जातील.
यावेळी वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, धनगर समाजाचे सिद्धार्थ बन्ने, बेरड समाजाचे शिवाजी नाईक, कॉ. गोविंद पानसरे विचार मंचचे अध्यक्ष प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आशपाक मकानदार यांचीही भाषणे झाली.
मोर्चात मौलाना अजिम पटेल, अरविंद कित्तूरकर, हारुण सय्यद, रमजान अत्तार, राहुल पाटील, बाळासाहेब मुल्ला, राजू जमादार, इकबाल शायन्नावर, राजू खलिफा, युनूस नाईकवाडे, मुस्ताक मुल्ला, महंमदअली पठाण, जावेद बुडेखान, एम. एस. बोजगर, इर्षाद मकानदार, घुडूसाहेब मुगळे आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


शिष्टमंडळात सर्वधर्मीय
सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यासाठी भेटलेल्या शिष्टमंडळात मुस्लिम बांधवांसह मराठा, लिंगायत व बेरड समाजातील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉ. पानसरेंना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

कुठे आहेत आमदार-खासदार ?
मुस्लिम समाजाच्या मतांवर ज्यांनी सत्ता भोगली ते माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, पी. एन. पाटील ही मंडळी समाजाच्या हक्काच्या लढाईत कुठे आहेत ? त्यांनी कार्यकर्त्यांसह आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॉ. मुरसल यांनी यावेळी केले.


आम्ही गोळ्या झेलायला
स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रच लढतील. पानसरेंचा खून करून भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, धर्मनिरपेक्षतेसाठी गोळ्या झेलायला आम्हीदेखील तयार आहेत, असेही कॉ. मुरसल यांनी यावेळी स्पष्ट केले.

कबनूर येथे निदर्शने
इचलकरंजी : मुस्लिम आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कबनूर (ता. हातकणंगले) येथील मुस्लिम समाजाच्यावतीने मुख्य चौकात रास्ता रोको व शंखध्वनी आंदोलन केले. तसेच शासननिर्णयाच्या परिपत्रकाची होळी करून शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात दिलावर पटेल, अल्ताफ मुजावर, जावेद फकीर, गणी मुल्ला, समीर जमादार, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Muslim-Maratha fight against government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.