मुस्लिम बांधवांनी झिडकारली ३० लाखांची ‘आॅफर’
By Admin | Updated: November 11, 2016 00:35 IST2016-11-11T00:37:33+5:302016-11-11T00:35:09+5:30
गडहिंग्लजमध्ये लोकशाही बळकट : घरटी वर्गणी काढून सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा निर्णय-- गुड न्यूज

मुस्लिम बांधवांनी झिडकारली ३० लाखांची ‘आॅफर’
राम मगदूम -- गडहिंग्लज --मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांच्या देणगीची आॅफर देतानाच त्या मोबदल्यात नगरपालिकेच्या निवडणुकीत समाजाने आपल्याला एकजुटीने मतदान करावे, अशी अपेक्षा येथील नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराने आपल्या चाहत्याकरवी केली होती. मात्र, ‘तो’ प्रस्ताव एकजुटीने झिडकारण्याबरोबरच लोकशाहीतील ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ आणि ‘मताधिकार’ अबाधित ठेवण्यासाठी घरटी वर्गणी काढून आपले सांस्कृतिक सभागृह आपल्याच पैशातून बांधण्याचा
स्तुत्य निर्णय येथील मुस्लिम समाजबांधवांनी एकमुखाने
घेतला.
ऐन निवडणुकीच्या हंगामात सामाजिक आदर्शाचा नवा वस्तुपाठ निर्माण केल्याबद्दल गडहिंग्लजच्या मुस्लिम समाजाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोणतीही निवडणूक आली की धनाढ्य उमेदवाराकडून मतांची सौदेबाजी सुरू होते. एकेका मतापासून ‘गठ्ठा’ मतदानासाठी प्रलोभने दाखविली जातात. व्यक्तिगत आणि सार्वजनिक कामासाठीदेखील आमिष दाखविले जाते. लोकशाहीतील संकेत पायदळी तुडवून मतांचीही राजरोस सौदेबाजी होते. मात्र, त्याला येथील मुस्लिम बांधवांनी छेद दिला आहे.
पुरोगामी आणि शांतताप्रिय शहर म्हणून गडहिंंग्लजची सर्वदूर ओळख आहे. सुमारे २१ हजार मतदारांपैकी मुस्लिम मतदारांची संख्या जवळपास चार हजार आहे. त्यामुळेच ‘त्या’ ‘चाणाक्ष’ उमेदवाराने मुस्लिम समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांच्या देणगीची आॅफर दिली होती. त्यासंदर्भात विचारविनियम करून निर्णय घेण्यासाठी चार दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाची बैठक झाली.
बैठकीत मुस्लिम समाजातीलच एका कार्यकर्त्याने तो विषय चर्चेसाठी मांडला. समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी ३० लाखांचा प्रस्ताव आला आहे. त्याला किंवा त्यापेक्षा जादा देणाऱ्यास समाजाने एक मत द्यावे आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार मतदान करावे, अशी सूचना केली. मात्र, तसे केल्यास मुस्लिम समाजाबद्दल गैरसमज आणि राजकीय कटुता निर्माण होऊन गावातील सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचेल म्हणून त्यास जोरदार विरोध
झाला.
गडहिंग्लजमध्ये एकूण लोकसंख्येपैकी चारआणे लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे. अनेक वर्षांपासून येथील हिंदू-मुस्लिम गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यामुळेच या ठिकाणी कधीही जातीय तेढ निर्माण झाले नाही. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करणारा मुस्लिम शिवजयंतीच्या मिरवणुकीतही सहभागी होतो. परवाच्या मराठा मोर्चातही त्यांनी भाग घेतला होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळेच समाजाने हा सौदा फेटाळला.
३० लाखांसाठी समाज कुणाच्याही दावणीला बांधू नका. प्रत्येकाला इच्छेप्रमाणे मतदान करू द्या.
दानशूरांकडून देणगी आणि घरपती दहा हजारांची वर्गणी काढून आपले सभागृह आपणच बांधूया, असे मत अनेकांनी मांडले. त्याचे उपस्थित सर्वांनी स्वागत केले.
काहींनी ५० हजार ते लाखापर्यंतची देणगी स्वेच्छेने जाहीर केली तर उर्वरित समाजबांधवांनी १० हजारांची वर्गणी हप्त्याने देण्याची तयारी दाखविली.
चर्चेअंती सांस्कृतिक सभागृह लोकवर्गणीतूनच बांधण्याचा निर्णय झाला.