ग्रामीण भागातही संगीत कलाकार
By Admin | Updated: January 19, 2015 00:49 IST2015-01-19T00:47:55+5:302015-01-19T00:49:12+5:30
हृदयनाथ मंगेशकर : दत्तवाडमध्ये राज्यस्तरीय संगीत गायन स्पर्धा उत्साहात

ग्रामीण भागातही संगीत कलाकार
कुरुंदवाड : भारतीय संगीताची जाण नव्या पिढीला व्हावी व संगीत पुढे नेणारे कलाकार निर्माण होण्यासाठी दत्तवाड दत्त भजनी मंडळाने संगीत गायन स्पर्धेचा घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमाने ग्रामीण भागातही संगीत कलाकार निर्माण होतील, असा विश्वास भावगंधर्व पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केला.
दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दत्त भजनी मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय लहान व खुल्या गटातील संगीत गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सा. रे. पाटील होते. यावेळी दत्तवाड ग्रामस्थ व संयोजन समितीच्यावतीने पं. हृदयनाथ मंगेशकर यांना भगवान विभूती बाबा महाराज संगीतरत्न, तर माजी आमदार पाटील यांना योगीराज दत्तगुरू समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणेसह राज्यातील कानाकोपऱ्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये लहानात लहान ७ वर्षे ते ८० वर्षे वयोवृद्ध गायकांच्या सुमधुर वाणीचा आस्वाद दत्तवाडसह परिसरातील संगीत श्रोत्यांनी घेतला.
राज्यस्तरीय संगीत गायन स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- लहान गट - प्रथम - ओंकार पाटील (नेसरी), द्वितीय - समृद्ध कांबळे (आजरा), तृतीय - केदार सोहणी (गडहिंग्लज), उत्तेजनार्थ - योगेश मुळे (नांदणी) व युगंधरा केचे (औरंगाबाद). खुल्या गटाचा निकाल - प्रथम - संपदा माने (कोल्हापूर), द्वितीय - श्रेया सोंदर (ठाणे), तृतीय- स्वरूपा बर्वे (कोल्हापूर) उत्तेजनार्थ - किमया लोलेकर (पुणे), धनश्री गाडगीळ (सांगली). स्पर्धेचे परीक्षक म्हणून ऋषिकेश बोडस, डॉ. भारती वैशिपायन व विनोद ठाकूर-देसाई यांनी काम पाहिले. यावेळी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, प. पू. अदृश्य शिवयोगी बाबा महाराज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडा माने, कर्णसिंह घोरपडे-सरकार, सरपंच लक्ष्मी माने, स्पर्धाप्रमुख दिलीप शेंडे, गिरीश कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष अशोक सुतार, आदी उपस्थित होते. नियोजन समिती स्वागताध्यक्ष चंद्रशेखर कलगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.