नियतच नसणाऱ्या मुश्रीफांचा बेईमान कारभार
By Admin | Updated: April 11, 2015 00:08 IST2015-04-11T00:07:12+5:302015-04-11T00:08:44+5:30
संजय घाटगेंचा पलटवार : शिक्षणमंत्री असताना व्हनाळीसाठी माध्यमिक शाळाही दिली नाही

नियतच नसणाऱ्या मुश्रीफांचा बेईमान कारभार
साके : मुश्रीफ यांची लबाडी, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार हे सगळे कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. त्यांच्या बेईमान कारभाराचे उदाहरण म्हणजे जिल्हा बँक आहेच. पैसा, सत्ता आणि लबाडीने जिल्ह्याला चिरडण्याची राक्षसी प्रवृत्तीच्या मुश्रीफ यांची भाषा असते, त्या ‘नियतच’ नसणाऱ्या मुश्रीफांना देवाचे नाव घेताना लाज कशी वाटत नाही? असा पलटवार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला.ते व्हनाळी (ता. कागल) येथे पत्रकारांशी बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, व्हनाळीच्या समृद्धी दूध संघाच्या माळावर मुश्रीफ यांनीच तालुक्यात दोन-दोन आमदार असतील, अशी खोटी घोषणा केली. आम्ही विनाभ्रष्टाचार काम करून सामान्यांचे जीवनमान उंचावल्यानेच सत्ता नसतानाही कार्यकर्ते एकनिष्ठ राहिल्याचे कौतुक केले आणि माझ्याच कार्यकर्त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवून माझ्यापासून दूर करून संधीचा फायदा घेतला. असली लबाड, फसवी, अनाचारी वृत्ती लक्षात येताच मी बाजूला झालो. एवढेच काम करणाऱ्या मुश्रीफ यांनी माझे इतर कोणतेही काम केले नाही. युतीत असताना व्हनाळी गावातील मुले चार किलोमीटर चालत जातात, यासाठी माध्यमिक शाळा द्या, एवढीच मागणी मी मुश्रीफ शिक्षणमंत्री असताना केली होती. परंतु, त्यांनी माझीही फसवणूकच केली.
घाटगे म्हणाले, जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यावर आमच्या सेवा संस्था आणि कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, या अटीवर जिल्हा बँकेत दोनवेळा मुश्रीफ यांना बिनविरोध निवडून दिले. निवडून आल्यावर दोन दिवससुद्धा ही अट त्यांनी पाळली नाही.
जिल्ह्यात पी. एन. पाटील हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी माझ्याशी प्रामाणिक मैत्री आणि भावासारखे प्रेम केले. त्यांच्यामुळेच आम्हाला ‘गोकुळ’चे संचालकपद मिळाले. म्हणूनच ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ गटाने उमेदवारी दिली नसली तरी माघार घेण्याचा माझा अंतिम निर्णय झाला होता. परंतु, कागल तालुक्यात सर्वांत जास्त ‘गोकुळ’चे मतदान आमच्या पार्टीकडे असूनसुद्धा आम्हाला डावलल्याच्या क्रोधापोटी कार्यकर्त्यांनी अंबरिश यांची उमेदवारी मागे घेऊ दिली नाही. आमची लोकप्रियता बघून मुश्रीफांना पोटशूळ उठला. महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यात व आमच्यात व संजय मंडलिक यांच्यात फूट पाडता आली नाही म्हणून ते स्वार्थाची भाषा करून आगपाखड करीत आहेत. परंतु, दिवंगत खा.सदाशिवराव मंडलिकांचा आदर्श ठेवून मतदार आम्हाला निवडून देतील याची खात्री आहे.
आमच्या भीतीमुळेच मुश्रीफांचे लोटांगण
घाटगे म्हणाले, बोलण्यात बढाई असणाऱ्या मुश्रीफांच्या बाहुबळात दमच नाही. कारण आम्हाला भिऊन भेदरलेल्या अवस्थेत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन गुडघे टेकून लोटांगण घातले. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सवयीप्रमाणे विश्वासघात केला आहे.