मुश्रीफ यांचे नाव चक्क दारिद्र्यरेषेच्या यादीत!
By Admin | Updated: July 24, 2016 00:34 IST2016-07-24T00:32:26+5:302016-07-24T00:34:26+5:30
स्वत:च केला गौप्यस्फोट : कागलला शौचालय अनुदान वाटप, महिला बचत गटांना स्वयंअर्थसाहाय्य प्रदान

मुश्रीफ यांचे नाव चक्क दारिद्र्यरेषेच्या यादीत!
कागल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना गॅस-शेगडी देण्याची योजना आणली. या यादीत माझेही नाव आहे. खरे तर गरजू व्यक्तींना मोफत गॅस कनेक्शन शेगडी द्यायला हवी; पण चुकीच्या पद्धतीने सर्व सुरू आहे. आता व्यासपीठावर समरजितसिंह घाटगे असल्याने भाजप व मोदी यांच्यावर टीका करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे जाहीर केले. शाहू साखर कारखान्याच्या निवडणुकीत समरजित घाटगे यांना ‘अन्कंडिशनल’ पाठिंबा देण्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली.कागल नगरपालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते महिला बचत गटांना स्वयंअर्थसाहाय्य व शौचालय उभारणी अनुदान, रमाई घरकुल योजना अनुदानाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, कागल बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘कागल हे राज्यात, देशात पहिलेच असले पाहिजे हे स्वप्न राजेसाहेब आणि आम्ही पाहिले होते. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व मोठे आहे. कागल शहराच्या विकासाचा पाया राजेसाहेबांनी घातला. त्यावर कळस चढविण्याची जबाबदारी मंत्रिपदामुळे माझ्यावर आली. त्यात मी यशस्वी झालो. कागल शहराचा एकही भूमिपुत्र बेघर राहणार नाही. त्यासाठी आणखी घरकुले उभारण्याचे माझे अभिवचन आहे. कागल नगर परिषदेपूर्वी शाहू कारखान्याची निवडणूक होते. ती बिनविरोध व्हावी, अशी आमची भूमिका आहे. इतरांप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यासाठी पाठिंबा जाहीर करीत आहे.’
समरजित घाटगे म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय राजेसाहेब आणि आमदार मुश्रीफ यांची आघाडी नगरपालिकेत झाली होती. त्यावेळी या दोघांनी कागल शहराबद्दल जे स्वप्न पाहिले, त्याची पूर्तता होत आहे. शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासने बऱ्याचअंशी पूर्ण झाली आहेत. देशपातळीवर ‘स्कॉच स्वच्छ भारत पुरस्कार’ कागल नगरपालिकेस मिळाल्याने कागलची मान उंचावली.
यावेळी आप्पासाहेब भोसले, भय्यासाहेब माने यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षा संगीता गाडेकर यांनी स्वागत केले. पक्षप्रतोद रमेश माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डॉल्बीमुक्त उत्सवासाठी पुढाकार
स्वच्छता अभियानात महत्त्वाचे काम साफसफाई करणाऱ्यांचे आहे. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे आणि त्यांच्या पथकाचे जाहीर अभिनंदन केले पाहिजे. कागल शहरातील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवात महिलांचा सहभाग घ्यावा, डॉल्बीविरहित उत्सव करावा, असेही आवाहन घाटगे यांनी केले.
कागल बँकेस राजेसाहेबांचे नाव द्या...
कागल को-आॅप. बँकेस स्वर्गीय विक्रमसिंह राजेसाहेबांचे नाव द्यावे. या प्रस्तावाला सूचक होण्याचा मान मला द्या, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली.
डॉल्बीमुक्त उत्सवासाठी पुढाकार
स्वच्छता अभियानात महत्त्वाचे काम साफसफाई करणाऱ्यांचे आहे. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे आणि त्यांच्या पथकाचे जाहीर अभिनंदन केले पाहिजे. कागल शहरातील गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवात महिलांचा सहभाग घ्यावा, डॉल्बीविरहित उत्सव करावा, असेही आवाहन घाटगे यांनी केले.
कागल बँकेस राजेसाहेबांचे नाव द्या...
कागल को-आॅप. बँकेस स्वर्गीय विक्रमसिंह राजेसाहेबांचे नाव द्यावे. या प्रस्तावाला सूचक होण्याचा मान मला द्या, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली.