यमगेमध्ये मुश्रीफ, संजय घाटगे गटाची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST2021-01-25T04:26:08+5:302021-01-25T04:26:08+5:30
मुरगूड : यमगे (ता. कागल) या ग्रामपंचायत निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे आघाडीला सहा जागा मिळत सरशी झाली. ...

यमगेमध्ये मुश्रीफ, संजय घाटगे गटाची सरशी
मुरगूड : यमगे (ता. कागल) या ग्रामपंचायत निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे आघाडीला सहा जागा मिळत सरशी झाली. सर्व प्रवर्गातील उमेदवार या आघाडीकडे असल्याने सरपंच आरक्षणावर सर्वांच्या नजरा आहेत. विरोधी मंडलिक राजे आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुश्रीफ गटाचे राजाराम कुंभार यांचा एका मताने झालेला पराभव मुश्रीफ गटाच्या जिव्हारी लागला.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मुश्रीफ, मंडलिक, राजे व पाटील गटाची महाआघाडी झाली होती. विरोधात मात्र संजय घाटगे गटाने निकराची झुंज दिली. पण अपेक्षितपणे महाआघाडीला दहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी मुश्रीफ आणि मंडलिक गटाला सरपंचपदाची संधी मिळाली होती. पण निवडीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाचे प्रमुख विजय भोसले आणि मुश्रीफ गट यांच्याशी वाद झाल्याने सुरुवातीपासून मुश्रीफ आणि संजय घाटगे गटाची युती निश्चित होती.
मुश्रीफ गटाने यावेळी आपल्या वरिष्ठ नेत्यांना थांबवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ही जमेची बाजू झाली.
शामराव पाटील,शिवाजीराव पाटील, साताप्पा पाटील यांनी उमेदवारी न घेता नवीन उमेदवारांना पुढे केले. संजय घाटगे गटाचे प्रमुख दिलीप पाटील यांनी मात्र आपल्या हक्काच्या प्रभागात उमेदवारी घेत विजयी झाले. प्रभाग एक व चार हे मुश्रीफ गटाचे प्रभाग. त्यामुळे यातील सहा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास होता. पण प्रभाग चारमधून राजाराम कुंभार यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. येथे प्रथमच मंडलिक गटाचे साताप्पा कुंभार विजयी झाले.
प्रभाग तीनमध्ये मंडलिक गटाचे प्रमुख विजय भोसले यांचे चिरंजीव अभयसिंह विजयी झाले. प्रभाग दोनमधून मुश्रीफ गटाचा विशाल पाटील हा तरुण कार्यकर्ता विजयी झाला. पण अन्य दोन उमेदवार मात्र पराभूत झाले. सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार बघून मतदान झाल्याने गोंधळाचे वातावरण होते.
विजयी उमेदवार-प्रभाग एक-दिलीपसिंह पाटील, विजया कुंभार, ज्योती लोकरे, प्रभाग दोन - विशाल पाटील, संजीवनी पोवार, शोभा गुरव, प्रभाग तीन - अभयसिंह भोसले, पूजा सुतार, प्रभाग चार - संदीप पाटील, प्रमिला पाटील, साताप्पा कुंभार.