अध्यक्षपदी मुश्रीफ !
By Admin | Updated: May 22, 2015 00:39 IST2015-05-22T00:35:46+5:302015-05-22T00:39:42+5:30
जिल्हा बँक : उपाध्यक्षपदी काँग्रेसचे अप्पी पाटील बिनविरोध

अध्यक्षपदी मुश्रीफ !
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँगे्रसचे आमदार हसन मुश्रीफ यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसचे विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसचे विलास गाताडे यांनी अर्ज दाखल केला होता; पण त्यांनी माघार घेतल्याने निवडी बिनविरोध झाल्या.
जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी भाजप आघाडीला एक जागा मिळाली. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत फारशी चुरस नव्हती; पण अध्यक्षपदावर कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ या दोघा दिग्गजांनी दावा केल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडीकडे लागले होते. बुधवारी (दि. २०) शासकीय विश्रामगृह येथे दोन्ही कॉँग्रेस नेत्यांच्या बैठकीत एकमत झाले नसल्याने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता शाहूपुरी येथील श्रीपतरावदादा बॅँकेत पुन्हा आमदार मुश्रीफ, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे, के. पी. पाटील, निवेदिता माने, आदी संचालकांची बैठक झाली. यामध्ये आमदार मुश्रीफ यांचे नाव निश्चित करण्यात आले. उपाध्यक्षपदावर आवाडे यांनी विलास गाताडे यांच्यासाठी आग्रह धरला; पण पी. एन. पाटील व आमदार महाडिक यांनी अप्पी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
निवडणूक अधिकारी महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या. यावेळी बोलताना माजी मंत्री विनय कोरे यांनी प्रशासकीय कामकाजावर टीका केली. गायकवाड कारखाना व ‘दौलत’बाबत प्रशासकांनी चुकीचा निर्णय घेतला. गायकवाड कारखाना चालविण्यास देताना त्यांनी वसुलीबाबत प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला.
कार्यकर्त्यांची शपथ
बॅँकेची गाडी, भत्ता, फोन घेणार नाही, काटकसर करण्याचे ठरविले आहे. चूक करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. कार्यकर्त्यांनीही शपथ घेतली आहे, बेकायदेशीर काम सांगायचे नाही. थकीत संस्था आहेत, त्यांनी वसुलीसाठी मदत करावी, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
चुकीचा कारभार झाल्यास पायउतार : हसन मुश्रीफ
जिल्हा बँकेचा कारभार करताना कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही. राजकीय अभिलेष बाजूला ठेवून अनेक वर्षे आमच्यावर लागलेला डाग धुऊन काढण्यासाठी सभासदांनी दिलेल्या संधीचे सोने करू. यासाठी बँकेची गाडी, मोबाईल या सेवेसह भत्ताही घेणार नाही, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. अध्यक्षपदी निवड झाली म्हणून कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नाही, हा दिवस एक संकल्प करण्याचा आहे. ज्या दिवशी चुकीचा कारभार होईल त्यादिवशी या पदावरून पायउतार होऊ, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, बँकेच्या इतिहासात पाच वर्षे लाजिरवाणी प्रशासकीय कारकीर्द अनुभवली. जिल्हा बँक सामान्यांची रक्तवाहिनी आहे, येथे पुन्हा लोकशाही मार्गाने सभासदांनी आम्हाला संधी दिलीय. आता कठोर कारभार करावा लागणार आहे. वसुलीबाबत जागरूक राहून निर्णय घेणार आहे. उपाध्यक्ष अप्पी पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक, सर्जेराव पाटील-पेरिडकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, विलास गाताडे, आदी उपस्थित होते.
नमुश्रीफ ४१ वे अध्यक्ष
हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी २० नोव्हेंबर १९९६ ते २४ नोव्हेंबर १९९९ पर्यंत
बॅँकेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली असून, ते बॅँकेचे ४१ वे अध्यक्ष म्हणून गुरुवारी विराजमान झाले.
दोन वर्षांनंतर ‘पी. एन.’
पहिल्या वर्षी पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदाचा आग्रह धरला होता; पण पहिली दोन वर्षे राष्ट्रवादीला, तर त्यानंतर दोन वर्षे पी. एन. पाटील यांना देण्यात येणार आहेत. शेवटच्या वर्षी राष्ट्रवादीला संधी मिळेल, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.