मुश्रीफ - पी. एन.अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

By Admin | Updated: May 8, 2015 01:05 IST2015-05-08T01:04:52+5:302015-05-08T01:05:08+5:30

कोरे ठरणार किंगमेकर : पेरिडकर-गाताडे यांना उपाध्यक्षपदाची संधी

Mushrif - P. In the N. Presidential race | मुश्रीफ - पी. एन.अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

मुश्रीफ - पी. एन.अध्यक्षपदाच्या स्पर्धेत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते माजी आमदार पी. एन. पाटील हे प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरण्याची चिन्हे आहेत. पहिल्यांदा या दोघांपैकीच कुणाला तरी ही संधी मिळणार हे स्पष्टच आहे परंतु अध्यक्ष कोण होणार हे ठरविण्याची निर्णायक मते विनय कोरे यांच्याकडे असल्याने तेच ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक संचालक सर्जेराव पाटील-पेरिडकर किंवा काँग्रेसचे विलास गाताडे यांना उपाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड २५ मेपर्यंत होऊ शकते.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी सध्याचे बलाबल पाहता मुश्रीफ व पी. एन. या दोघांनाही म्हणजे राष्ट्रवादी व काँग्रेसलाही अध्यक्षपदाची संधी आहे. ‘आम्ही म्हणेल तो अध्यक्ष’ अशी स्थिती दोघांपैकी एकटा कुणीच म्हणू शकत नाही. त्यांना दोघांनाही एकत्रित येऊनच या निवडी कराव्या लागतील.
बँकेच्या एकवीस संचालकांपैकी आता राष्ट्रवादीकडे ७, काँग्रेस ६, अपक्ष ३, जनसुराज्य २ मंडलिक १, शिवसेना-भाजप १ असे बलाबल आहे. गगनबावड्यातून पी. जी. शिंदे विजयी झाल्यास राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढेल. अपक्षमधील राजेंद्र पाटील-यड्रावकर हे राष्ट्रवादीचेच असल्याने त्यांचे संख्याबळ ९ वर पोहोचू शकते. नरसिंगराव पाटील व अशोक चराटी हे राष्ट्रवादीच्या विरोधी गटातून विजयी झाल्याने ते काँग्रेससोबत राहण्याची चिन्हे आहेत. संजय मंडलिक हे देखील काँग्रेससोबतच राहतील. त्यामुळे काँग्रेसचेही संख्याबळ ९ होते. त्यांना कोरे यांनी पाठबळ दिल्यास त्यांचा अध्यक्ष होऊ शकतो.
परंतु सध्या बँकेची स्थिती अजूनही म्हणावी तेवढी चांगली नाही. त्यामुळे निवडून आल्यावर लगेच वाद नकोत म्हणून शक्यतो पहिली निवड ही बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे.

‘मुश्रीफ’ च कारभारी
मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’मध्ये महाडिक व पी. एन. यांना पाठिंबा दिल्याने त्यांची सत्ता तिथे आली. त्यामुळे आता बँकेत काँग्रेसने आपल्याला सहकार्य करावे, असा आग्रह मुश्रीफ यांचा असू शकतो तसेच घडण्याची जास्त शक्यता आहे. बँकेच्या कारभारासाठी अनुभवी नेतृत्व हवे म्हणून मुश्रीफ यांच्याकडे हे पद देण्याचे समर्थन केले जाऊ शकते. बँकेचे ते अध्यक्ष झाल्यास उपाध्यक्षपद काँग्रेसचे संचालक विलास गाताडे यांना दिले जाऊ शकते. कारण गाताडे यांचे मुश्रीफ यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.

Web Title: Mushrif - P. In the N. Presidential race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.