मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

By Admin | Updated: April 8, 2015 00:58 IST2015-04-08T00:57:07+5:302015-04-08T00:58:26+5:30

‘गोकुळ’चे रणांगण : पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये ही दक्षता; आता स्वतंत्र पॅनेलशिवाय पर्याय नाही

Mushrif-KP's take care of their own politics | मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

मुश्रीफ-केपींना स्वत:च्या राजकारणाचीच काळजी

कोल्हापूर : पक्षाचे धोरण अथवा कार्यकर्त्यांना बळ देण्याचे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वत:चे राजकारण कसे सुरक्षित होईल यासाठी दबावतंत्र म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचा वापर करत आहेत. आता नाक दाबल्यामुळेच त्यांना स्वतंत्र पॅनेल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या आहेत.
कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसवर आमदार हसन मुश्रीफ यांची पकड आहे. त्यामुळे ते जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल. परवा झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी पाठिंबा देण्याबाबत अथवा विरोध करण्याबाबत कोणतीच उघड भूमिका घेतली नाही. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील आदींनी सत्तारुढ आघाडीला पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला. मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत ‘गोकुळ’चे संचालक रणजित पाटील यांची मदत झाली. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यापुरताच मुश्रीफ यांना या निवडणुकीत रस आहे.
रणजित पाटील गटाचे पाठबळ हे कागल तालुक्याच्या राजकारणातील हसन मुश्रीफ यांची अपरिहार्यता आहे. रणजित पाटील हे काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नव्हेत. खासगीत ते आपण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्माअगोदरपासून ‘गोकुळ’मध्ये संचालक असल्याचे सांगतात. शिवाय मुश्रीफ यांनी वजन वापरले अथवा नाही वापरले तरी त्यावरून त्यांची उमेदवारी ठरत नाही. कारण त्यांची ‘ज्येष्ठ संचालक’ म्हणून ‘गोकुळ’च्या राजकारणात स्वतंत्र ताकद आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी त्यांच्यासाठी आग्रह हा विधानसभेतील मदतीची परतफेड एवढ्यापुरताच मर्यादित आहे. हसन मुश्रीफ हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी द्या, असा आग्रह धरण्यापेक्षा ते संजय घाटगे गटाला ‘गोकुळ’मध्ये घेऊ नका म्हणून पक्षाची ताकद वापरत आहेत.
माजी आमदार के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्यामुळे माजी आमदार बजरंग देसाई गटाने मदत केली परंतु तरीही ते पराभवाची त्सुनामी टाळू शकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यादृष्टीने बिद्री साखर कारखान्याची सत्ता टिकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना आमदार महादेवराव महाडिक यांची रसद हवी आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांना दुखावण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. (प्रतिनिधी)


जावई माझा भला...
‘बिद्री’च्या निवडणुकीत आमदार महाडिक के.पी. यांच्या मागे राहतील आणि माजी आमदार पी. एन. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मागे असतील. कारण ‘भोगावती‘च्या निवडणुकीवरून के.पी.-मुश्रीफ यांच्याशी पी. एन. यांचा संघर्ष आहे. आता पी. एन. व महाडिक ‘गोकुळ’मध्ये एकत्र असले तरी ‘भोगावती’त मात्र महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसलाच मदत करणार, हे देखील नक्की आहे. तिथे पुन्हा के. पी. यांचेच जावई सत्तेत आहेत. त्यामुळे महाडिक यांच्या पाठिंब्याची किंमत ही के. पी. यांच्यादृष्टीने जास्त आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून ‘गोकुळ’मध्ये मिळाली तर एखादी जागा पदरात पाडून घ्यावी, नाही तर महाडिक यांच्याशी जमवून घ्यावे व जी सत्ता हातात आहे, ती कशी कायम राहील यासाठी ते धडपड करत आहेत.


‘गोकुळ’ का नको..
‘गोकुळ’चा संचालक म्हणजे चार-दोन गावांत प्रभाव पाडू शकणारा नेता शिवाय आर्थिक रसदही. त्यामुळे आपल्याच तालुक्यातच पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये, असे या नेत्यांना वाटते. कागलसारख्या चुरशीच्या लढतीत तर अशा संचालकांचे महत्त्व फारच वाटते. विधानसभेला मुश्रीफ यांना रणजित पाटील यांच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागतात हा अनुभव आहेच. त्यामुळे दिलीच तर के.पी. यांच्या मुलाला संधी द्या, अशीच या दोघा नेत्यांची मागणी होती.

Web Title: Mushrif-KP's take care of their own politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.