मुश्रीफ-कोरे यांची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: July 15, 2015 00:52 IST2015-07-15T00:52:37+5:302015-07-15T00:52:37+5:30
बाजार समिती निवडणूक : सेना-भाजप, काँग्रेस आघाडीचा धुव्वा; उशिरापर्यंत मतमोजणी सुरूच

मुश्रीफ-कोरे यांची हॅट्ट्रिक
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने विजयाची हॅट्ट्रिक केली. विकास संस्था गटातील सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून समितीवर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असून, विरोधी काँग्रेस आणि शिवसेना-भाजप आघाडीचा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. उर्वरित गटातील मतमोजणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तिसऱ्यांदा राष्ट्रवादी आघाडीने सत्ता स्थापन केली असली तरी गेले दीड वर्षे समितीवर प्रशासक आहे.
बाजार समितीसाठी आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीचे ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास’, पी. एन. पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी’ अशी तिरंगी लढत झाली.
रविवारी (दि. १२) विकास संस्था, ग्रामपंचायत, अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार व पणन प्रक्रिया संस्था या गटांत १९,५९६ मतदान (८९.६० टक्के) झाले. १९ जागांसाठी ११० उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली.
बाजार समितीच्या कारभारावर आरोप झाले ते धुऊन काढून देशातील नंबर वनची बाजार समिती करू. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून संचालक काम करतील.
- हसन मुश्रीफ, आमदार
विकास संस्था गटातील निकाल पाहिला तर अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील जनता कोणाच्या बाजूने आहे, हे दिसून येते.
- विनय कोरे, माजी आमदार
पराभव मान्य आहे. राष्ट्रवादीने दगा दिल्याने पूर्ण ताकदीने पॅनेल बांधता आले नाही. त्यांनी दगाबाजी केली नसती तरी पॅनेल बांधणीस वेळ मिळाला असता आणि चित्र वेगळे असते.
- पी. एन. पाटील, शाहू आघाडी
संचालकांनो, पैसे खाल तर कॅन्सर होईल
विकास संस्थेच्या एका मतपत्रिकेवर ७ पैकी ५ मते ‘शिवणयंत्र’ व एक मत ‘रोडरोलर’ला देऊन ‘संचालकांनो, पैसे खाल तर कॅन्सर होईल’ असा दम दिलेली चिठ्ठी आढळली.