मुश्रीफ समर्था घरचे श्वान
By Admin | Updated: June 22, 2015 00:45 IST2015-06-22T00:44:58+5:302015-06-22T00:45:36+5:30
राजू शेट्टींचा पलटवार : राज्य बॅँकेतून थेट संस्थांना कर्ज पुरवठ्यासाठी प्रयत्नशील

मुश्रीफ समर्था घरचे श्वान
कोल्हापूर : ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना भीती वाटत असेल, असे छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत म्हटले होते. शरद पवार यांच्यावर टीका केलीच नव्हती; पण हसन मुश्रीफ हे समर्था घरचे श्वान आहेत. पवारसाहेबांना बरे वाटावे म्हणून ते वारंवार आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. शरद पवार यांच्यावर टीका केल्याबद्दल शनिवारी हसन मुश्रीफ यांनी शेट्टी यांच्यावर जहरी टीका केली होती, याबाबत शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा बॅँकेत हसन मुश्रीफ आणि मंडळी कशी निवडून आली, हे जनतेला माहिती आहे. जिल्हा बॅँकेचा निकाल लागल्यानंतर ३९२ कोटींच्या ठेवी का कमी झाल्या? कऱ्हाडमधून आलेल्या प्रशासकांनी कोल्हापुरातील जनतेचा विश्वास संपादन करत कर्जाबरोबर ठेवीही वाढविल्या. थकबाकीचे प्रमाण कमी केले, मग हे २१ जणांच्या संचालकांना का जमत नाही? हे संचालक निवडून आल्यानंतर ठेवी कमी होतात, हे कशाचे द्योतक आहे. तुम्ही निवडून कसे आलात, हे लोकांनाही माहिती आहे. शेतकऱ्यांच्या कर्जातून ठेव कपातीचा निर्णय अन्यायकारक आहे. पैसे काय तुमच्या बापाचे आहेत का? विकास संस्थांच्या गुंतवणुकीवर गेले अनेक वर्षे व्याज दिले जात नाही. असे असताना शेतकऱ्यांना वेठीस धरून पुन्हा संस्था अडचणीत आणणार असाल, तर त्याचे गंभीर परिणाम बॅँकेला भोगावे लागतील. खासगी बॅँका, नागरी बॅँका मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करू पाहत आहेत. अशा स्पर्धेत विकास संस्था टिकणार का? या धोरणामुळे राज्य बॅँकेने थेट विकास संस्थांना कर्जपुरवठा करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत असेल, अशी आपण प्रतिक्रिया दिली होती; पण हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर टीका केली. ते समर्था घरचे श्वान आहेत. पवार रविवारी सांगली दौऱ्यावर असल्याने त्यांना बरे वाटावे म्हणून त्यांनी टीका केली असावी, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.
मग बॅँकेला कवटाळून बसा
लोकशाही मार्गाने निवडून आल्याची टीमकी वाजवू नका. कोणत्या मार्गाने निवडून आला, हे सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्यांना वेठीस धराल तर बॅँकेतील व्यवहार बंद करावे लागतील. मग बसा बॅँकेला कवटाळून, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)
कारखान्यांवरील कारवाईसाठीच धडक : राजू शेट्टी
कोल्हापूर : थकबाकी असल्याने शेतकऱ्यांना कर्जे मिळेनात. साखर कारखानदारांची अडचण पाहून आतापर्यंत थांबलो. आता आमच्या गळ्यापर्यंत आल्याने आमचे पैसे द्या; अन्यथा कारखान्यांवर फौजदारी दाखल करा, या मागणीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आज, सोमवारी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, याबाबत शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, केंद्र सरकारच्या सहा हजार कोटी पॅकेजचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे गेला आहे. पॅकेजच्या माध्यमातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांना प्रतिटन ३५० रुपये मिळणार आहेत. मळी नियंत्रणमुक्त केल्याने त्यातून ७० ते ८० रुपये, असे ४२० रुपये कारखानदारांना उपलब्ध होणार आहेत. परंतु, कारखानदार अजूनही ७०० रुपयांचे शॉर्टमार्जिन असल्याचा कांगावा करत आहेत. पॅकेजचे पैसे मिळण्यास अजून १५ दिवस लागतील.