फरास नाराजीवर मुश्रीफ यांची सारवासारव
By Admin | Updated: July 19, 2015 00:27 IST2015-07-19T00:24:08+5:302015-07-19T00:27:20+5:30
राजीनामा

फरास नाराजीवर मुश्रीफ यांची सारवासारव
कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदासाठी सहा महिन्यांची मुदत ठरली असताना आदिल फरास यांनी पुन्हा मुदतवाढ मागणे अयोग्य आहे. मीच आर. के. पोवार व राजेश लाटकर यांना त्यांच्याकडे राजीनामा मागण्यास पाठविले होते. त्यामुळे फरास यांनी केलेले वक्तव्य केवळ गैरसमजातून असावे, अशा शब्दांत महापालिकेतील राजकारणावर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सारवासारव केली.
राजीनामा मागायला घरी गेल्यामुळे संतप्त झालेल्या फरास यांनी आर. के. पोवार व राजेश लाटकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस व पालिकेतील नगरसेवकांत दुही असल्याचे स्पष्ट होते. त्याबाबत प्रसिध्दी पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले की, फरास हे पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी माझी अपेक्षा होती. महापौर राजीनामा प्रकरणात किती रामायण घडले याची त्यांना जाणीव होती. लाटकर हे पक्षाचे शहराध्यक्ष, तर पोवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही. (प्रतिनिधी)