संग्रहालयाच्या निविदा ५ आॅगस्टला उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:22 IST2017-07-13T00:22:58+5:302017-07-13T00:22:58+5:30
राजर्षी शाहू जन्मस्थळ : ११ कोटींचा प्रस्ताव तातडीने करा; आढावा बैठकीत सूचना

संग्रहालयाच्या निविदा ५ आॅगस्टला उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू जन्मस्थळावर उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाच्या उर्वरित ११ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचे काम तातडीने मार्गी लावा, अशा सूचना याकामी नेमण्यात आलेल्या संग्रहालय उपसमितीने केल्या आहेत. बुधवारी दुपारी या समितीची बैठक शाहू जन्मस्थळ येथे झाली. दोन कोटी आठ लाख रुपयांच्या कामाच्या निविदा ५ आॅगस्टला उघडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जन्मस्थळाचे कामकाज गतीने होण्यासाठी याआधीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार हे या समितीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. याअंतर्गत संग्रहालय उपसमिती नेमण्यात आली आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे काम लवकरच सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५ आॅगस्टला दोन कोटी आठ लाखांच्या कामांची निविदा उघडण्यात येईल. निविदा मंजूर करून त्या पुरातत्त्वकडे पाठवून पुन्हा एकदा यासाठी शासनाची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर कार्यआदेश देऊन काम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी पुरातत्त्व विभागाचे सहायक अधीरक्षक अमृत पाटील यांनी सांगितले.
संग्रहालय उपसमितीचे अध्यक्ष, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, कामाला वेग येण्याची गरज आम्ही व्यक्त केली. पुढचे ११ कोटी लवकरात लवकर कसे मिळविता येतील यासाठी तातडीने प्रस्ताव आणि आराखडा करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. डॉ. रमेश जाधव म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे या कामांना वेग आला असून त्यांनी या कामात जातीने लक्ष घातले आहे. यावेळी समितीचे सदस्य इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, सदस्य सातारा संग्रहालयाचे सहा. अभिरक्षक उदय सुर्वे, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, बगीचा उपआवेक्षक उत्तम कांबळे उपस्थित होते.