शौमिका महाडिक यांची शेवटच्या फेऱ्यांत विजयी मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:22+5:302021-05-05T04:39:22+5:30

(अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, अनुराधा पाटील व सुश्मिता पाटील यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ...

Musandi won by Shaumika Mahadik in the last round | शौमिका महाडिक यांची शेवटच्या फेऱ्यांत विजयी मुसंडी

शौमिका महाडिक यांची शेवटच्या फेऱ्यांत विजयी मुसंडी

(अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, अनुराधा पाटील व सुश्मिता पाटील यांचे फोटो वापरावेत)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महिला राखीव गटातील निकाल श्वास रोखून धरणारा ठरला. या गटातून अगदी सुरुवातीपासूनच विरोधी गटाच्या उमेदवार अंजना केदारी रेडेकर यांनी निर्विवाद आघाडी घेतली. पण सत्तारूढ गटाच्या शौमिका अमल महाडिक यांनी शेवटच्या दोन फेऱ्यांत मताधिक्य मिळवून विजय खेचून आणला. या गटातून विद्यमान संचालिका अनुराधा बाबासाहेब पाटील सरुडकर व सुश्मिता राजेश पाटील यांना पराभवास सामाेरे जावे लागले.

रेडेकर ११३ मतांनी, तर महाडिक ४० मतांनी विजयी झाल्या. महाडिक यांच्या विजयाने सत्तारूढ आघाडीचे विजयाचे खाते उघडले. विद्यमान संचालिका अनुराधा पाटील यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. त्या शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या आई, तर माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या पत्नी आहेत. विरोधी आघाडीत आमदार विनय कोरे यांना घेतल्याच्या रागातून त्यांनी सत्तारूढ आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठबळामुळे सत्तारूढ आघाडीस मोेठे बळ मिळाले, परंतु ते मातोश्रींचा विजय खेचून आणण्यात अपयशी ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चंदगडचे आमदार व गोकुळचे संचालक राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या उमेदवारीस त्यांनी केलेला विरोध, तसेच पॅनेलशिवाय स्वत:ची यंत्रणा लावण्यात ते कमी पडल्याने त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. स्वत: आमदार असूनही राजेश पाटील चंदगड मतदारसंघ सोडून जिल्ह्यात फार कुठे फिरल्याचे दिसले नाही. सुश्मिता पाटील या दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या कन्या. परंतु त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर अत्यंत कमी होता. गोकुळचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांचा लोकांना परिचय झाला. या सगळ्यामुळे त्यांचा पराभव झाला. याउलट अंजना रेडेकर या महिला काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय आहेत. गेल्यावेळी त्या लढल्या होत्या. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत कुठे व किती गुंतवणूक करावी लागते, हे त्यांना चांगले माहीत होते. त्यामुळे पॅनेलशिवाय त्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा लावून एकेक मत जास्त मिळविले.

शौमिका महाडिक यांच्या विजयासाठी महाडिक कुटुंबियांनी प्रतिष्ठा पणाला लावली. माजी आमदार महादेवराव महाडिक हे संघाचे गेली तीस वर्षे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सर्व जिल्ह्यांत ठरा‌वधारकांशी संपर्क होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी महाडिक स्टाईलने लावलेल्या जोडण्याही शौमिका यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्या.

अशी झाली चुरस...

मतमोजणीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. त्यामध्ये रेडेकर पहिल्यापासूनच आघाडीवर राहिल्या. सुरुवातीच्या तीन फेऱ्यांत दुसऱ्या जागेसाठी अनुराधा पाटील व सुश्मिता पाटील यांच्यात रस्सीखेच होती. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सुश्मिता पाटील कमी मतांनी का असेना, परंतु आघाडीवर होत्या. पाचव्या फेरीपासून शौमिका महाडिक व सुश्मिता पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू झाली. पाचव्या फेरीअखेर महाडिक यांना १०८१ व पाटील यांना १०५८ मते मिळाली. पुढे सहाव्या फेरीअखेर सुश्मिता पाटील ३ मतांनी पुढे सरकल्या. त्यांना १२८४, तर महाडिक यांना १२८१ मते मिळाली. सात‌व्या फेरीत सुश्मिता पाटील यांनी आघाडी वाढवली व त्यांची एकूण मते १५०५ झाली. त्यावेळी महाडिक १४८३ मतांवर होत्या. परंतु आठव्या फेरीअखेर महाडिक यांना १७४० मते मिळाली व सुश्मिता पाटील यांना १७१३ मते मिळाली. या फेरीअखेर महाडिक यांचे मताधिक्य २७ ने वाढले. नवव्या कमी मतांच्या फेरीत महाडिक यांना २५, तर पाटील यांना १२ मते मिळाली. त्यामुळे महाडिक ४० मतांनी विजयी झाल्या.

महिला राखीव गटातील उमेदवारांना मिळालेली अंतिम मते अशी...

अंजना केदारी रेडेकर (विजयी-विरोधी आघाडी) : १८७७

शौमिका अमल महाडिक (विजयी- सत्तारूढ आघाडी) : १७६४

पराभूत उमेदवार : सुश्मिता राजेश पाटील (पराभूत-विरोधी आघाडी) - १७२४

अनुराधा बाबासाहेब पाटील सरुडकर (पराभूत-सत्तारूढ आघाडी) - १७००

वैशाली बाजीराव पाटील (अपक्ष) : १२

या गटाची मोजलेली मते : ७१११ वैध : ७०७७ व अवैध मते : ३४

Web Title: Musandi won by Shaumika Mahadik in the last round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.