मुरूडे : हत्तींचा धिंगाणा; मोठे नुकसान
By Admin | Updated: December 19, 2014 23:23 IST2014-12-19T23:04:37+5:302014-12-19T23:23:34+5:30
शेतकऱ्यांनी गाव गाठले : भीतीचे वातावरण; नारळाची झाडे उद्ध्वस्त

मुरूडे : हत्तींचा धिंगाणा; मोठे नुकसान
ज्योतिप्रसाद सावंत - आजराऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुडे गावातील शेतात टस्कर हत्तीने काल, गुरुवारी रात्री अक्षरक्ष: धिंगाणा घालत ऊसासह केळी, नारळ, गहू पिकांचे प्रचंड नुकसान केले.मुरुडे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतातील घरामध्ये राहणाऱ्या मंडळींनी थेट गाव गाठले आहे.
घटनास्थळ व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, काल, गुरुवारी रात्री गावच्या दक्षिणेकडून हत्तींनी पाणंदीतून मुरुडे गावच्या हद्दीतील शिवारात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. बैलगाडी सुमारे ६० फुटावर नेऊन टाकली. रात्रभर शेतातील नारळाची झाडे, केळीची रोपे मुळापासून उपटून टाकली, तर मेसकाठ्या, ऊस, गहू यांचेही प्रचंड नुकसान केले. उभी नारळाची झाडे कोसळताना होणारा आवाज, हत्तींचा चित्कार ऐकून ग्रामस्थांनी पुढे अंधारात जाण्याचे धाडस झाले नाही.
वनखात्याच्या मर्यादा स्पष्ट
हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पोळगाव येथे हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच हत्तीने आपला मोर्चा मुरुडेकडे वळवत नुकसान केले. वनखात्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
बैलगाडीचे झाले खेळणे
बाळू पाटील यांचे शेतातील घर उंचावर असल्याने हत्तीने त्यांच्या दारातील भिरकावलेली बैलगाडी सुमारे साठ फुटावर मोडलेल्या अवस्थेत उलटी होऊन पडली आहे.
आम्ही करायचे काय ?
अनपेक्षितरीत्या हत्तीने मुरुडे गावालगतच्या शेतामध्ये प्रवेश करून सुमारे लाखभर रुपयांचे रात्रीत नुकसान केले आहे. नारळ व केळीची झाडे उद्ध्वस्त केली. आम्ही आता करायचे काय ? असा सवाल नुकसानग्रस्त बाळू पाटील यांनी केला.
- नुकसानग्रस्त शेतकरी बाळू पाटील