महाराष्ट्र केसरी विजयने मारले नेर्ले कुस्ती मैदान
By Admin | Updated: March 30, 2015 00:24 IST2015-03-29T22:09:14+5:302015-03-30T00:24:32+5:30
या मैदानात लहान-मोठ्या १०० हून अधिक कुस्त्या झाल्या.

महाराष्ट्र केसरी विजयने मारले नेर्ले कुस्ती मैदान
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे जंगली महाराज आश्रमच्यावतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात आत्मा मलिक कुस्ती केंद्राचा मल्ल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने लपेट डावावर महावीर केसरी अण्णा कोळेकर याच्यावर रोमहर्षक विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. या मैदानात लहान-मोठ्या १०० हून अधिक कुस्त्या झाल्या.
रामनवमीनिमित्त आयोजित या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाच्या लढतीत सचिन जामदार याने राजाराम यमगर (मोतीबाग) याच्यावर अत्यंत अटीतटीच्या लढतीत घुटना डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत जयपाल वाघमोडे याच्यावर संदीप माने याने विजय मिळवला. चतुर्थ लढतीत कैलास सुरटी (शाहूवाडी) याच्यावर विश्वजित कदम याने नेत्रदीपक विजय मिळवला. सर्वांत प्रेक्षणीय कुस्ती ठरली ती वाटेगावचा मल्ल सुकुमार जाधव व अमित कारंडे (गंगावेश) यांची. यामध्ये अमितने मच्छिगोता डावावर सुकुमारवर विजय नोंदवला. इतर विजयी मल्लांमध्ये विवेक नायकल, नीलेश कोरे, दिग्विजय पाटील, सचिन वाघ, भाऊ पाटील, अभिजित माने, शुभम चव्हाण, निरंजन बालगावे, रोहन रणखांबे, अजय केसरे, सौरभ झेंडे, अमन मुल्ला, अबू मुल्ला, हृषीकेश कदम, सूरज वीरकर, अभिषेक पाटील, गौरव कदम यांचा समावेश आहे.
यावेळी दिलीपराव पाटील, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, गणपतराव आंदळकर, दीनानाथ सिंह, शिवाजी पाचपुते, बापू लोखंडे, आनंदराव धुमाळ, हणमंतराव जाधव, अशोक मोरे, लिंबाजी पाटील, अमन सावंत, बाळासाहेब देसाई, हर्षवर्धन देसाई, हणमंतराव पाटील, अभिजित धोंडपुडे उपस्थित होते.
शंकर पुजारी, ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. आप्पासाहेब कदम, झुंजार पाटील, धनंजय महाडिक, सतीशकाका पाटील, जयसिंग कदम, उमेश महाडिक, प्रकाश आम्रे, सचिन वंजारी, धनाजी रणखांबे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)