‘गोकूळ’च्या शासन नियुक्त प्रतिनिधीपदी मुरलीधर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:28+5:302021-07-07T04:31:28+5:30
(फोटो-०६०७२०२१-कोल-मुरलीधर जाधव) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) शासन नियुक्त प्रतिनिधीपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ...

‘गोकूळ’च्या शासन नियुक्त प्रतिनिधीपदी मुरलीधर जाधव
(फोटो-०६०७२०२१-कोल-मुरलीधर जाधव)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) शासन नियुक्त प्रतिनिधीपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर रघुनाथ जाधव (हुपरी, ता. हातकणंगले) यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. जाधव हे गेली १६ वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
‘गोकूळ’च्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सत्तांतर घडविले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, जनसुराज्य या पक्षांनी नेटाने मोट बांधत २१ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीनंतर दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त असे तीन जागा भरता येणार आहेत, त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातून डझनभर इच्छुक आहेत.
मुरलीधर जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधीपदी नियुक्ती केल्याचे आदेश मंगळवारी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाच्या कार्यासन अधिकारी अस्मिता जावडेकर यांनी काढले. अचानकपणे त्यांच्या निवडीची बातमी धडकताच अनेकांना धक्का बसला.
देर आये दुरुस्त आये...
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात मुरलीधर जाधव यांची हातमाग महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली होती. हे महामंडळ फारसे ताकदीचे नव्हते, त्यातच महामंडळाच्या पत्ता सापडेपर्यंत सरकारचा कालावधी संपल्याने त्यांच्यावर अन्याय झाला होता. आता ‘गोकूळ’वर संधी देऊन पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सन्मान केल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.
विधानपरिषदेनंतरच ‘स्वीकृत’ संचालक
शासन नियुक्त प्रतिनिधींची नियुक्ती झाल्यानंतर स्वीकृतसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये घालमेल सुरू आहे. दोन्ही कॉंग्रेस या जागा भरणार असल्या तरी आगामी विधानपरिषदेची निवडणूक पाहता, आता निर्णय होणे कठीण आहे.
कोट-
गेली सोळा वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी रस्त्यावरची लढाई केली. त्याचे फळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या पदाचा वापर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच केला जाईल.
- मुरलीधर जाधव (शासन नियुक्त प्रतिनिधी, गोकूळ)