मुरगूडला पतसंस्था फोडली

By Admin | Updated: September 10, 2014 23:54 IST2014-09-10T23:32:08+5:302014-09-10T23:54:00+5:30

सव्वा लाख रुपये लंपास : चोरीचे सत्र सुरूच; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Murlagudo broke the patronage | मुरगूडला पतसंस्था फोडली

मुरगूडला पतसंस्था फोडली

मुरगूड : मुरगूड (ता. कागल)मध्ये अज्ञातांनी रात्री गजबजलेल्या ठिकाणी असणाऱ्या सरपिराजीराव पतसंस्थेची तिजोरी फोडून रोख सव्वा लाखाची रोकड लंपास केली. सहा घरांवर दरोडा पडलेली घटना ताजी असताना पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावरील पतसंस्थेत चोरी झाल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुरगूडमधील एस. टी. स्टँडवरून तुकाराम चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच जुन्या सरपिराजीराव पतसंस्थेचे कार्यालय आहे. दररोज सव्वा ते दीड लाख रुपयांच्या ठेवी या संस्थेत जमा होतात. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने बाजारातील व्यापाऱ्यांकडून आणलेल्या ठेवींचे पैसे आणण्यास कर्मचाऱ्यांना उशीर झाल्याने ते सर्व पैसे संस्थेतील तिजोरीमध्ये ठेवले होते.
मुरगूडमधील काही मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका पहाटेपर्यंत सुरू होत्या. त्यामुळेच या गर्दीचा आणि आवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी संस्थेच्या पाठीमागील बाजूने प्रवेश केला. कटावणीने मागील दाराच्या बिजागऱ्या काढून अख्खा दरवाजाच बाजूला उचलून ठेवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आत आल्यानंतर मुख्य कार्यालयामधील टेबलांची शोधाशोध केली; पण त्या ठिकाणी काहीच न सापडल्याने त्यांनी कॅशिअर केबिनमध्ये येण्यासाठी आतील बाजूस असणारा दरवाजा त्याच पद्धतीने तोडला. तेही दार बाजूला ठेवून कॅशिअर केबिनमध्ये असणाऱ्या तिजोरीकडे त्यांनी मोर्चा वळविला.
केबिनमधील तिजोरी कटावणीने अक्षरश: फोडली. त्यामध्ये असलेली रोकड चोरट्यांनी लंपास केली. नंतर पाठीमागील दारानेच चोरटे पसार झाले. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुढील दरवाजा उघडून संस्था कर्मचारी नामदेव शिंदे आत गेल्यानंतर
त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती देऊन मुरगूड पोलिसांना कल्पना दिली. स.पो.नि. चंद्रकांत मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन कोल्हापुरातील ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. (वार्ताहर)
चोरीचा दुसऱ्यांदा प्रयत्न
याच संस्थेवर काही वर्षांपूर्वी छताची कौले काढून चोरट्यांनी आत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संस्थेत काहीच सापडले नव्हते; पण यावेळी मात्र सव्वा लाखाच्या रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला.
सोने वाचले
दिवसभरामध्ये साने तारणातून संस्थेकडे जमा झालेले दागिने संस्थेतच ठेवले जातात; पण मंगळवारी दुपारी ते दागिने दुसऱ्या बॅँकेतील लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्याने वाचले; अन्यथा ते सर्व दागिनेही चोरीस गेले असते.

Web Title: Murlagudo broke the patronage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.