दारूसाठी जीवलग मित्रांवरच केला खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:15+5:302021-01-17T04:22:15+5:30
कोल्हापूर : दारू पिण्यास दिली नाही म्हणून मित्रावरच चाकूने खुनी हल्ला करण्याची घटना शनिवारी दुपारी उमा चित्रमंदिरच्या पिछाडीस गल्लीत ...

दारूसाठी जीवलग मित्रांवरच केला खुनी हल्ला
कोल्हापूर : दारू पिण्यास दिली नाही म्हणून मित्रावरच चाकूने खुनी हल्ला करण्याची घटना शनिवारी दुपारी उमा चित्रमंदिरच्या पिछाडीस गल्लीत घडली. हल्ल्यात सिद्धांत राजेश साळोखे (वय २५, रा. ९१० सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गणेश बापू पाटील (रा. सुभाष रोड, रिलायन्सनजीक, मूळ रा. मंगळवार पेठ) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी सिद्धेश व गणेश हे दोघे जीवलग मित्र होते, कोठेही दोघेच एकत्र जात होते. शनिवारी सकाळी ते दोघेजण शाहुपुरी कुंभार गल्लीतील एका मित्राच्या श्राद्धासाठी गेले होते. तेथून जेऊन ते परतले. दोघेही दुपारी उमा चित्रमंदिर पिछाडीस असणाऱ्या सिध्देशच्या घरी काहीवेळ झोपले. त्यानंतर दोघांच्यात दारू पिण्यावरून वाद उफाळला. वाद वाढतच जाऊन दोघांत झटापट झाली, त्यावेळी गणेशने रागातच सिद्धेशच्या घरातील देवाऱ्यावरील पितळी चाकू घेऊन सिद्धेशच्याच पोटात भोसकला. त्याच्यावर सपासप वार केले. यामध्ये सिद्धेशच्या छातीवर, हातावर, पाठीत खोलवर जखमा झाल्या. त्याच रक्तबंबाळ अवस्थेत तो धावतच घरातून बाहेर उमा चित्रमंदिर चौकात रस्त्यावर आला. त्याला पाहून चौकात खळबळ उडाली. चौकातील एकाने सिद्धेशला तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीची शोधमोहीम राबविली. याबाबत सिद्धेश साळोखे यांने दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गणेश पाटील याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.