'आयजीएम'मध्ये पालिकेने ऑक्सिजन प्लँट उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:48+5:302021-04-27T04:23:48+5:30
इचलकरंजी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना ...

'आयजीएम'मध्ये पालिकेने ऑक्सिजन प्लँट उभारावा
इचलकरंजी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, लॉकडाऊनची घोषणा केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने नियोजन केले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आयजीएममध्ये नगरपालिकेने ऑक्सिजन प्लँट उभा करावा, त्यासाठी आवश्यक सर्व मदत देऊ, असे आश्वासन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
शहरातील आयजीएम हॉस्पिटलमध्ये कोरोनासंबंधित आरोग्य यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहे का याची पाहणी करण्यासाठी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन माहिती घेतली.
यड्रावकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. नागरिकांचा सर्वे करून उपयोजनांबाबत प्रभाग समितीने दक्ष राहणे आवश्यक आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलनी फायर ऑडिट करणे आवश्यक आहे. आयजीएमसह खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अहवालासह कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार यावर नियंत्रण असले पाहिजे. त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या शहरात अधिक असून त्यांच्या अँटिजेन चाचण्या वाढविल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र शेट्ये, आरोग्यधिकारी योगेश साळे, डॉ. सुहास कोरे, डॉ. महाडिक, नगरसेवक मदन कारंडे, राहुल खंजिरे, राजीव आवळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२६०४२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, डॉ. योगेश साळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील,वैद्यकीय अधीक्षक रवींद्र शेटे, नगरसेवक मदन कारंडे, राहुल खंजिरे उपस्थित होते.